'सकाळी साडेसहा वाजता रुमची बेल वाजली आणि…', वर्षा उसगांवकरांनी सांगितला चाहत्याचा आलेला तो विचित्र अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 07:06 PM2023-05-22T19:06:15+5:302023-05-22T19:06:51+5:30
अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये पाहायला मिळत आहेत.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये पाहायला मिळत आहेत. वर्षा उसगावकर यांच्याकडं मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. त्यांच्या सौंदर्याचे, छान दिसण्याचे नेहमीच कौतुक होताना दिसते. त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे. त्यांच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना चाहत्यांचे अनेक विचित्र अनुभव आले. याबाबत आता नुकतेच त्यापैकी काही अनुभव त्यांनी शेअर केले आहेत.
वर्षा उसगांवकर यांनी नुकतेच द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांच्याबरोबरच मंदाकिनी आणि संगीता बिजलानीहीदेखील सहभागी झाल्या होत्या. या वेळी या तिघींनी दिलखुलासपणे त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसेच त्यांनी त्यांना आलेले अनेक गमतीशीर अनुभवही सांगितले. या कार्यक्रमात वर्षा उसगांवकर यांनी अनेकदा चाहत्यांमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे सांगितले.
याबद्दल वर्षा उसगांवकर म्हणाल्या, एकदा मी ट्रेनने प्रवास करत होते. मी खूप दमले होते. त्यामुळे मी ट्रेनमध्ये झोपले होते. इतक्यात माझा चाहता माझ्याकडे आला आणि त्यांनी उठवले. माझे स्टेशन येत आहे आणि मला तुमची सही हवी आहे, हे कारण त्यांनी मला सांगितले.
पुढे त्यांनी सांगितले की, तर एकदा मी कोल्हापूरमध्ये शूटिंग करत होते. त्या वेळी मी एका हॉटेलमध्ये थांबले असताना सकाळी साडेसहा वाजता माझ्या रूमची बेल वाजली. मला वाटलं की हॉटेलमधील कोणी सफाई कर्मचारी असेल. मी नुकतीच झोपेतून उठली असल्याने पूर्ण अवतारात होते. मी दार उघडले तर तो माझा चाहता होता. तो मला म्हणाला की, मॅडम मला तुमची सही हवी आहे. इतक्या सकाळी फक्त सहीसाठी त्याने माझ्या रूमची बेल वाजवल्यामुळे मी त्याला ओरडले होते.