"काही माणसं असतात जी टिकतात आणि...", जितेंद्र जोशीची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:11 IST2025-01-31T13:10:49+5:302025-01-31T13:11:31+5:30
अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi)ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आलीय.

"काही माणसं असतात जी टिकतात आणि...", जितेंद्र जोशीची पोस्ट चर्चेत
अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने हिंदी सिनेइंडस्ट्रीतही आपली छाप उमटविली आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
जितेंद्र जोशीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, माझी माणसं!! सुषमा हेयर ड्रेसर म्हणजे केसांचं नियोजन (केशभूषा) आणि स्टाइलिंग करणारी तर सुनील मेकअप म्हणजे रंगभूषा करणारा. दोघे पहिल्यांदा मला भेटले ते हेमंत ढोमेच्या टीममध्ये बघतोस काय मुजरा कर चित्रपटाच्या शूटिंगला. अत्यंत गुणी आणि आपापल्या कामात तरबेज अशा दोन व्यक्ती. सुनील लाजरा बुजरा तर सुषमा खमकी पण प्रेमळ! शूटिंगच्या मध्ये मध्ये मोकळा वेळ मिळाला की दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत; उगाचच हसत उभे. मी काही दिवस त्यांचं निरीक्षण करत त्यांची केमिस्ट्री बघत होतो. त्यांना एक दिवस म्हणालो “तुम्ही लग्न करा; छान जोडी आहे". तर सुनील म्हणाला “सर तसं काही नाही आमच्यात!” मी म्हणालो “अरे तुम्हाला दिसत नाहीये जे मला दिसतंय!! पुढे तेच घडलं आणि दोघे विवाहबंधनात अडकले मग त्यांना श्रीयान नावाचं एक गोंडस लेकरू झालं !
अभिनेत्याने पुढे लिहिले की, सुनील एकदा बोलता बोलता म्हणाला “सर तुम्हाला हिंदी चित्रपटात पाहायची इच्छा आहे. तुमचं टैलेंट.,!!..!! वगैरे .. वगैरे.. आणि ज्या दिवशी हिंदी चित्रपट मिळाला मी अर्थातच सुनील ला म्हणालो ये आता, दोघे जाऊ. सुनील इतर सर्व कामांना सोडून आला. इतर काम सांभाळत तो माझ्या सोबत असतो . इतकंच नव्हे आमच्या पानी फाउंडेशन च्या शूटिंग ला जिथे मी एकही रुपया घेत नाही तिथेही तो अगदी नवख्या मुलाला मिळेल इतक्या पैशात मला सजवायला येतो . परवा माझ्या वाढदिवसाला फोन आला. ''सर शिर्डीला आलोय आम्ही , बाबांकडे तुमच्या साठी प्रार्थना केली''. माझ्या चेहऱ्यावर हसू आणि डोळे ओलावलेले! मी म्हटलं ''एक अंगठी आण''. आज घरी आले तिघे प्रसाद, अंगठी, बाबांचा फोटो आणि केक घेऊन! आईने सुषमाची ओटी भरली साडी चोळी आणि त्याच्या बाळाला खाऊ दिला. तिघे घरी गेले न जेवता कारण गुरूवारचा उपवास होता.
हेच सवंगडी हवेत सोबत शेवटपर्यंत!!
माझ्या कृत:कृत्य झालेल्या हृदयाने मी विचार करतोय की वेळोवेळी मिळणारे मानसन्मान, पुरस्कार घरातल्या एका कोपऱ्यात पडून राहतात परंतु असे सवंगडी आपल्या नकळत आपला विचार करतात आपल्या साठी प्रार्थना करतात जी प्रार्थना आपल्या पाठी आपल्यासाठी उभी असते. चित्रपट यशस्वी/अयशस्वी होतात. नाव, पैसा, यश. येतात आणि जातातंही! टिकत काहीच नाही परंतु काही माणसं असतात जी टिकतात आणि असतात तुमच्यासाठी! मी खरोखर खूप भाग्यवान आहे कारण माझ्या आयुष्यात अशी माणसे आहेत. आज साई यांच्या रूपाने घरी आले आणि आशिर्वाद देऊन गेले. श्रद्धा तर आहेच परंतु आणखी सबुरी मिळाली की मग प्रवास मस्त होईल परंतु हेच सवंगडी हवेत सोबत शेवटपर्यंत!!, असे जितेंद्रने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले.