"महिला करु शकत नाही अशी कुठलीही...", अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिलांना मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:56 IST2025-02-25T11:55:43+5:302025-02-25T11:56:47+5:30
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच एका मुलाखतीत महिलांना मोलाचा सल्ला दिला आहे.

"महिला करु शकत नाही अशी कुठलीही...", अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिलांना मोलाचा सल्ला
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नुकतेच प्राजक्ताने एका मुलाखतीत महिलांना मोलाचा सल्ला दिला आहे. यावेळी तिने महिला करु शकत नाही अशी कुठलीही गोष्ट नाही, असे म्हटलं आहे.
प्राजक्ता माळीने नुकतेच सुमन मराठी म्युझिक या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. यात तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने यावेळी महिलांना मोलाचा सल्लादेखील दिला आहे. तिने म्हटले की, जे वाटतंय की मला हे करायचं आहे. त्याला जरुर न्याय द्या. मार्ग निघतील, मार्ग काढा. आणि महिला करु शकत नाही अशी कुठलीही गोष्ट नाहीये. अष्टावधानी असते. ती एकावेळी आठ आठ गोष्टी करु शकते.यात प्रश्नच नाही की जमेल की नाही? संसार, पोरं, वय सगळं बाजूला ठेवून सुद्धा तुम्ही तुमची सगळी स्वप्ने पूर्ण करू शकता आणि वय हा तर विषयच बाजूला टाकून द्या. सो एज बिज काही नसते. नक्कीच तब्येत महत्त्वाची असते. ते मात्र तुम्ही व्यवस्थित ठेवलंत तर पन्नाशीला पण नवीन काहीतरी तुम्ही सुरू करु शकता आणि करायलाच पाहिजे.
तर घरामध्ये आपसूक आदर मिळतो
प्राजक्ताने पुढे म्हटलं की, तुम्हाला आतून उर्मी येतेय तर ते केलेच पाहिजे. सगळ्या महिलांनी आर्थिकरित्या स्वतःच्या पायावर उभे असले पाहिजे. या मताची मी आहे. कारण ती गोष्ट असल्यानंतर तुम्हाला आपसूक घरामध्ये एक आदर मिळतो आपसूक तुम्हाला एक सय येतो. तुम्ही दुसऱ्यावर कमी अवलंबून असता. तुमच्या तुमच्याच जीवाला ते बरं वाटतं.
वर्कफ्रंट
अभिनेत्री प्राजक्ता माळीने मालिका, वेबसीरिज आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम केले आहे. ती अभिनेत्रीसोबत उत्तम डान्सर, कवियत्रीदेखील आहे. याशिवाय तिचा ज्वेलरी ब्रॅण्डदेखील आहे. तसेच तिने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलंय. फुलवंती सिनेमाची निर्मिती आणि अभिनयदेखील केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता ती लवकरच 'चिकी चिकी बुबूम बुम' सिनेमात दिसणार आहे.