अशी झाली सोनाली कुलकर्णीची फजिती, अजूनही जपून ठेवलाय 'तो' टीशर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 01:28 PM2023-05-21T13:28:12+5:302023-05-21T13:28:33+5:30
मला 'कच्चा लिंबू' या मराठी चित्रपटातील किस्सा आठवतोय. 'कच्चा लिंबू' हा प्रसाद ओकने दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. यात रवी ...
मला 'कच्चा लिंबू' या मराठी चित्रपटातील किस्सा आठवतोय. 'कच्चा लिंबू' हा प्रसाद ओकने दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. यात रवी जाधव, मनमीत पेम, सचिन खेडेकर, अनंत महादेवन, उदय सबनीस अशी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाइट आहे. त्यामुळे शूटिंगदरम्यान मी टीमला शेवटच्या शेड्यूलमध्ये असं दिवशी आपण सगळे जण ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस कोड करून येऊ आणि एक छान फोटो घेऊ. अगदी शूटिंगच्या शेवटच्या दिवशी नको, कारण त्या दिवशी जरा धावपळ असते. त्यानुसार आम्ही सर्वांनी मिळून एक दिवस ठरवला. ज्या दिवशी आम्ही ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस घालून सेटवर येणार होतो त्याच्या आदल्या दिवशी आमचा खूप महत्त्वाचा सीन शूट होणार होता. दिवसभर शूट केलं आणि मी घरी गेले. घरी गेल्यावर मी विसरूनच गेले. सकाळी सात वाजताची शिफ्ट असल्याने साडेसहा वाजेच्या सुमारास मी सेटवर पोहोचले. मला पाहिल्यावर प्रसाद ओक, आणि इतर टीम मेंबर्सनी विचारलं की, हे काय?
मी म्हटलं, मला पोहोचायला केवळ एक-दीड मिनिटच उशीर झाला होता. त्यामुळे आश्चर्यचकित होण्यासारखं एवढं काय झालं? अशा आविर्भावात मी होते. आता पटापट तयार होते. मेकअप तसा काही नव्हताच. त्यामुळे कपडेच बदलायचे होते. मी त्यांना म्हणाले की, मी वेळेत रेडी असेन. डोन्ट वरी... ते मला म्हणाले, अगं काय हे? तू स्वतःकडे बघ ना... मला वाटत होतं की मी रेडी नाही म्हणून ते मला असं म्हणताहेत. त्यामुळे मी म्हटलं, अरे मी चाललेय कॉस्च्युम चेंज करायला.... . तेव्हा सगळे जण म्हणाले की, अगं आज ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस कोड तूच ठरवला होतास ना... आणि जो घालणार नाही त्याला पेनल्टीही तूच ठरवली होतीस ना... ते ऐकताच मला इतकं लाजल्यासारखं झालं की विचारू नका.
माझी खूपच मोठी फजिती झाली होती. मीच ठरवलं आणि स्वत:च एका वेगळ्याच रंगाचे कपडे घालून गेले होते. फाईन वगैरे देऊन काही उपयोग नव्हता. कारण फोटोमध्ये मी एकटीच वेगळी दिसले असते. माझ्या दिग्दर्शकीय टीमनं अतिशय प्रेमानं माझ्यासाठी एक ब्लॅक अँड व्हाइट टी-शर्ट आणलं आणि माझ्या फजितीला खूप खूप प्रेमानं व गोडव्यानं सावरून घेतलं. तो टी-शर्ट मी अजूनही जपून ठेवलं आहे.