परदेशात स्थायिक झालेली ही मराठमोळी अभिनेत्री नुकतीच परतली भारतात, शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 01:18 PM2023-02-23T13:18:15+5:302023-02-23T13:18:41+5:30
लग्नानंतर ही मराठमोळी अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली आहे.
लग्नानंतर अनेक अभिनेत्रींनी करिअरला रामराम करत परदेशात स्थायिक झाल्या आहेत. यात 'मन उधाण वाऱ्याचे' (Man Udhan Varyache) फेम अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre)चाही समावेश आहे. तिने सिनेइंडस्ट्रीला रामराम ठोकून नवऱ्यासह परदेशात स्थायिक झाली. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर नेहा मायदेशी म्हणजेच भारतात परतली आहे. यावेळी तिला घरच्यांना पाहून अश्रू अनावर झाले. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नेहा गद्रे हिने तिच्या इंस्टाग्रामवर माझी बॉलिवूड स्टाईल घरात एंट्री असं म्हणत तिचा परदेशातून पुण्यात आल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नानंतर नेहा ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. कोरोना संकट आणि शिक्षण यामुळे तिला भारतात यायला मिळत नव्हते. मात्र लग्नाच्या इतक्या वर्षानंतर नेहा नवऱ्यासोबत भारतात परतली आहे.
नेहाचे आई वडील पुण्यात असतात. भारतात आल्यानंतर पुण्यात येऊन नेहाने आपल्या कुटुंबाची भेट घेतली. विशेष म्हणजे आपल्या भाचीला इतक्या वर्षानंतर समोर पाहून नेहाला आपले अश्रू अनावर झाले. भाचीची भावुक करणारी भेट नेहाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
नेहा गद्रे हिने २ मार्च, २०१९ रोजी ईशान बापटसोबत लग्न केले. लग्नानंतर नेहा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. यानंतर ती अभिनय क्षेत्रापासून दुरावली. मात्र तिने परदेशात राहून एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. दोन वर्षे तिने अभ्यास आणि मेहनत करून डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली.
नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने 'अजूनही चांद रात आहे' या मालिकेत रेवाची भूमिका केली. 'मोकळा श्वास' चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. तसेच 'गडबड झाली' या चित्रपटातही तिने काम केले आहे.