यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसलेंना जाहीर; प्रसाद ओक-विद्या बालन यांचाही सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 07:34 PM2023-04-18T19:34:45+5:302023-04-18T19:35:47+5:30
यंदाच्या 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीच्या या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यंदाच्या 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीच्या या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली आहे. मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. दरम्यान मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल २०२३ रोजी पार पडणार आहे. मुंबईतील सायन येथील श्री षण्मुखानंद हॉल इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २४ एप्रिल रोजी मास्टर दीनानाथजींच्या स्मृतिदिनी हा सोहळा होईल.
दरम्यान गेल्या वर्षीपासून, मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिले आहे. मागील वर्षी या पुरस्काराचे मानकरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते. यावर्षी 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' लता मंगेशकर यांच्या लहान बहिणीला अर्थात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान केला जाईल. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालनचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.