टिंग्यामधील बालकलाकाराकडे एकेकाळी नव्हते घर, आज मेहनतीच्या बळावर त्याने केलीय परिस्थितीवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 08:00 AM2020-06-05T08:00:00+5:302020-06-05T08:00:02+5:30
टिंग्या या चित्रपटात छोट्याशा टिंग्याच्या भूमिकेत आपल्याला शरद गोएकरला पाहायला मिळाले होते.
टिंग्या’ या मराठी चित्रपटाला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मंगेश हाडवळेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर या चित्रपटात छोट्याशा टिंग्याच्या भूमिकेत आपल्याला शरद गोएकरला पाहायला मिळाले होते. टिंग्या या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला अनेक वर्षं झाले असून हा छोटासा शरद आता चांगलाच मोठा झाला आहे.
शरदच्या कुटुंबियांचा शेळ्या आणि मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय होता. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. पण त्याने यावर मात करत सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेत शिक्षण घेतले. त्यानंतरचे पुढचे शिक्षण पूणे युनिर्व्हसिटीतून पूर्ण केले. त्यानंतर त्याने सह्याद्री व्हॅले या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. या दरम्यान तो ब्रह्मवाणी वाग्देवाची या चित्रपटामध्ये झळकला. एवढेच नव्हे तर त्याने बब्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तसेच काही महिन्यांपूर्वी तो माझ्या प्रेमा या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाद्वारे त्याने एक अभिनेता म्हणून दहा वर्षांनी अभिनयक्षेत्रात कमबॅक केला होता. आता तो चित्रपटसृष्टीत कार्यरत असण्यासोबतच त्याने त्याच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे.
शरदने काही वर्षांपूर्वी किचन ट्रॉलीजचा व्यवसाय सुरू केला आहे. शरद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून त्याच्या फेसबुकच्या अकाऊंटवर आपल्याला त्याच्या या व्यवसायाविषयी माहिती मिळते. त्याच्या कंपनीचे नाव आयनॉक्स किचन कॉन्सेप्ट आहे. शरदचे बालपण अतिशय गरीब परिस्थितीत गेले आहे. पण आज त्याने आपल्या आर्थिक परिस्थितीवर चांगलीच मात केली आहे. यासाठी त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे. आज शरद जे काही आहे, त्याचे श्रेय त्याच्या आईवडिलांना देतो. त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्याच्या आई-वडिलांचे फोटो पाहायला मिळतात.