अशोक पत्की म्हणतात आजचे संगीत ह्रदयाला भिडणारे नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2016 05:44 PM2016-11-07T17:44:31+5:302016-11-11T10:48:29+5:30

अशोक पत्की यांनी आतापर्यंत जवळपास ७ ते ८ हजार जिंगल्स तयार केल्या आहेत. सिनेसृष्टीत शंकर महादेवनसारखा गायक, संगीतकार घडवणारा ...

Today's music, called Ashok Patki, is not a heart attack | अशोक पत्की म्हणतात आजचे संगीत ह्रदयाला भिडणारे नाही

अशोक पत्की म्हणतात आजचे संगीत ह्रदयाला भिडणारे नाही

googlenewsNext
ोक पत्की यांनी आतापर्यंत जवळपास ७ ते ८ हजार जिंगल्स तयार केल्या आहेत. सिनेसृष्टीत शंकर महादेवनसारखा गायक, संगीतकार घडवणारा हा अवलिया मात्र स्वत: कायम प्रकाशझोतापासून दूर राहिला. ५० वर्षांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया संगीतकार अशोक पत्की यांच्यासोबत लोकमत सीएनएक्सने मारलेल्या खास गप्पा..

तुमच्या जिंगल्स, नाटक आणि चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात कशी आणि कधी झाली?
मी पहिल्यांदा बीपीन शर्माकडे सिन्थेसायजर पाहिला आणि सुमन कल्याणपूरकर यांना मीही एक सिन्थेसायजर घेतो, असे सुचवले. यानंतर आम्ही कार्यक्रमासाठी कॅनडला गेलो, भारतात परतलो तेव्हा माझा सिन्थेसायजर आलेला होता. यानंतर मी वनराज भाटी, वैद्यनाथ यांच्याबरोबर वाजवायला सुरुवात केली. डबल बी सोप हे माझे करिअरमधले पहिले जिंगल जवळपास २५ वर्षे रेडिओवर वाजत होते. सकाळी बरोबर ८ वाजले की हे जिंगल लागायचे त्यावेळी अनेक लोकांकडे घड्याळं नसायची. त्यामुळे लोक हे जिंगल वाजले की, कामाला निघायचे. त्यानंतर मी जवळपास ७ ते ८ हजार जिंगल्स तयार केली. याच दरम्यान माझी ओळख पंडित जितेंद्र अभिषेकींशी झाली. मत्स्यगंधापासून ते तू तर चाफे कळी या त्यांच्या शेवटच्या नाटकापर्यंत मी अस्टिंट म्हणून काम केले. गोवा हिंदूला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ३ नाटक केली होती. यात ‘आटपाट नगराची राजकन्या’ या नाटकासाठी मी पहिल्यांदा संगीत दिले होते. अभिषेकी बुवांनी या नाटकासाठी माझे नाव सुचवले होते. यानंतर सुयोगच्या जवळपास ७५ नाटकांना मी संगीत दिले. तर ‘पैजेचा विडा’ हा मी संगीत दिलेला माझा पहिला चित्रपट.

तुम्ही नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलीत, आता मागे वळून पाहताना काय वाटते?
आज मागे वळून बघताना खूप समाधान वाटते. जे काम करायला मिळाले त्याबाबत मी देवाचा खूप आभारी आहे. मला कधीच कोणाकडे काम मागायला जावे लागले नाही. माझे काम बघून मला पुढचे काम मिळत गेले. फक्त हिंदीत काम न करता आल्याची खंत माझ्या मनात आहे.                                                                                                                                      

 ‘तू सप्तसूर माझे’ या तुमच्या कवितेचा जन्म कसा आणि कधी झाला?
मी आणि सुरेश वाडकर एका अल्ब्मसाठी काम करीत होतो. सुरेशजी त्याच दरम्यान अमेरिकेत गेले. अमेरिकेहून आल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि विचारले गाण्यांचे कुठेपर्यंत आले आहे. काहीही तयार नसताना मी सांगितले, हो गाणी तयार आहे. संध्याकाळी फोन करून ऐकवतो. त्यांना चाल ऐकवण्यासाठी म्हणून मी डमी शब्द लिहिले. सुरेशजींना ठरल्याप्रमाणे चाल ऐकवण्यासाठी मी गाण्याचा मुखडा लिहिला, तो संध्याकाळी त्यांना ऐकावला. गाण्याचा मुखडा सुरेशजींना प्रचंड आवडला आणि त्यांनी मला पूर्ण गाणे लिहिण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर प्रवीण दवणेंकडून ते गाणे तपासून घेण्याचे ठरले. दवणेंनी गाणे तपासताना यात एकच मोठी चूक असल्याचे सांगितले. तू सप्तसूर माझे यातला 'सू' दीर्घ हवा, तो -हर्स्व आहे. यानंतर आठ दिवसांत मी हे गाणे लिहून पूर्ण केले आणि शिवाजी पार्क गणेश मैदानात पहिल्यांदा हे गाणे सादर करण्यात आले.

मिले सूर मेरा तुम्हारा’ हे तुमच्या करिअरचे टर्निंग पॉइंट ठरले का ?
२००० साल उजाडेपर्यंत या गाण्याला मी संगीत दिले आहे, हे कुणाला माहिती नव्हते. माझ्या साठीनिमित्त आयोजित  कार्यक्रमात विलासराव देशमुख यांनी स्टेजवरून या गाण्याचा उल्लेख करून अशोकने या गाण्याला अतिशय सुंदर चाल लावली आहे, असे सांगितले. यानंतर लोकांना कळले, की या गाण्याला लुईसोबत मीही संगीत दिले होते. या गाण्यासाठी मी लुईला १०० पैकी २०० मार्क देईन. अतिशय सुंदर पद्धतीने त्याने हे गाणे गुंफले. वैद्यनाथन यांच्याकडे हे गाणे आले होते, त्यांनी मला चाल बनवून आणायला सांगितले. त्यानुसार मी ३ चाली तयार करून दिल्या, यातली एक चाल सिलेक्ट झाली. लता दीदी आणि भीमसेन यांनी गायलेल्या भागाला म्युझिक देण्याची जबाबदारी मलिक यांनी घेतली. 

आज इतक्या वर्षांनी संगीतात नेमका काय बदल झाल्याचे तुम्हाला जाणवते ?
आजचे संगीत आणि शब्द मनाला भिडत नाही. संगीतातली देवाण-घेवाण बंद झाली आहे. लता दीदी, मोहम्मद रफी यांच्याबरोबर आम्ही एका गाण्याची कमीत कमी ८ ते ९ दिवस रिहर्सल करायचो, पण आता ते होत नाही. हल्ली कोणाकडे रिहर्सल करायला वेळ नसतो. पहिल्यासारखी गाणी आता लिहिली जात नाही. सगळे व्यवसायिक झाले आहे. गाण्यातील मेलोडी हरवली आहे. त्यामुळे तरुण पिढीला याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Today's music, called Ashok Patki, is not a heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.