मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:39 PM2024-11-05T12:39:15+5:302024-11-05T12:39:50+5:30
जाड दिसणाऱ्या मराठी अभिनेत्रींना बॉलिवूड सिनेमांमध्ये कामवाली बाईची भूमिका मिळण्यावर तृप्तीने खंत व्यक्त केली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं.
अनेक मराठी अभिनेत्रींनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री तृप्ती खामकरदेखील अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकली आहे. क्रू या सिनेमामध्ये तिने करीना कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. पण, जाड दिसणाऱ्या मराठी अभिनेत्रींना बॉलिवूड सिनेमांमध्ये कामवाली बाईची भूमिका मिळण्यावर तृप्तीने खंत व्यक्त केली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं.
तृप्तीने नुकतीच सर्व काही या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला "कोणते नवीन प्रोजेक्ट करणार आहेस?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तिने कबीर सिंगमधील कामवाली बाई मी नाही असं सांगत पडद्यामागचं चित्र स्पष्ट केलं. ती म्हणाली, "मी काही ऑडिशन दिले आहेत. पण, कबीर सिंगमध्ये जी जाडी बाई धावते ती मी नाही. कबीर सिंगसाठी मी ऑडिशन दिलं होतं. पण त्यात जाड बाई झाडू घेऊन धावते एवढंच काम होतं. म्हटलं हे काम मी करणार नाही". यावर मुलाखतकाराने "लोकांना असं का वाटतं की ती तू आहेस?" असं विचारलं. त्यावर तृप्ती म्हणाली, "कारण ती जाड आहे. आणि तिने कामवाल्याबाईचं काम केलं आहे. आपल्याकडे असे स्टिरोओटाइप्स आहेत. मी आता जरी कामवाल्या बाईचं काम करत नसले. तरी किती वर्ष तेच काम केलंय. म्हणजे मी अर्बन कंपनीची कामवाली बाई, धर्मा कंपनीची कामवाली बाई अशी कुठली कुठली बाई केली आहे".
"मराठीतील नवीन किंवा अपकमिंग अभिनेत्रींना कामवाल्या बाईची कामं का मिळतात पण?" असा प्रश्नही तृप्तीला विचारण्यात आला. "कारण, हे टाइपकास्टच तसं केलं गेलेलं आहे. तुम्ही मराठी आहात. त्यामुळे मराठी अॅसेंटमध्ये तुम्ही हिंदी बोलू शकता. आणि त्यात जर तुम्ही जाड असाल, तर मग तुम्हाला बाईचंच काम मिळतं. म्हणजे मी असे वेस्टर्न कपडे घालून ऑडिशनला जायचे. तेव्हा मला ते छान दिसतेय म्हणून साडी आणलीस का? असं विचारायचे. युकेची बीचम हाऊस नावाची टेलिव्हिजन सीरिज आहे. त्यासाठी मी लंडन दीड महिना शूट केलं होतं. त्यामध्येही मी कामवाली बाईच्या भूमिकेत होते", असं तृप्तीने सांगितलं.