रूपेरी पडद्यावरही येणार 'अरेंज मॅरेज'चा ट्रेंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 09:53 AM2018-09-06T09:53:13+5:302018-09-06T09:55:38+5:30
प्रेम, प्रेमविवाह यांच्या पलीकडे जाऊन अरेंज मॅरेजमध्ये असलेली गंमत उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. अरेंज मॅरेजच्या निमित्ताने दोन कुटुबं, वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसं एकत्र येतात. त्यातून बरीच धमाल होते. लग्नातले विधी, त्यावेळी होणारी गडबड हे नाट्यमय असतं. हा सगळा प्रकार मनोरंजक पद्धतीने पहायला मिळणार आहे.
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रेम, लग्न, प्रेमविवाह या विषयांवर आधारित बरेच चित्रपट येत आहेत. या विषयांचा वेगवेगळ्या दृष्टीकोणातून विचार चित्रपटांतून केला जातो. या चित्रपटांच्या गर्दीत अरेंज मॅरेजकडे लक्ष वेधत अरेंज मॅरेजचं मनोरंजक पद्धतीने चित्रण 'तुझं माझं अॅरेज मॅरेज' या चित्रपटातून केलं जाणार आहे. दिनेश विजय शिरोडे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.
षष्ठीज फिल्म अँड एंटरटेन्मेंटचे अमित ललित तिळवणकर आणि अमोल कागणे फिल्म्सचे लक्ष्मण कागणे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अमोल कागणे फिल्म्सच्या लक्ष्मण कागणे यांनी अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेल्या 'हलाल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसंच 'लेथ जोशी', 'परफ्युम' या चित्रपटांचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. नेहमीच वेगळा विषय त्यांनी चित्रपटातून मांडला असल्याने 'तुझं माझं अरेंज मॅरेज' या चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
अरेंज मॅरेजचा विषय अतिशय धमाल आणि मनोरंजक पद्धतीने या चित्रपटातून मांडला जाणार आहे. चित्रपटाची कथा-गीतलेखन मयूर परदेशी, छायांकन सुनील बोरकर यांचे आहे. प्रतिक-प्रथमेश यांचे संगीत दिग्दर्शन असून गायक अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे, तर कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर यांचं आहे.
प्रेम, प्रेमविवाह यांच्या पलीकडे जाऊन अरेंज मॅरेजमध्ये असलेली गंमत उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. अरेंज मॅरेजच्या निमित्ताने दोन कुटुबं, वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसं एकत्र येतात. त्यातून बरीच धमाल होते. लग्नातले विधी, त्यावेळी होणारी गडबड हे नाट्यमय असतं. हा सगळा प्रकार मनोरंजक पद्धतीने पहायला मिळणार आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे, असं निर्माते अमोल लक्ष्मण कागणे यांनी सांगितलं.या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख आणि कलाकारांची नावही सध्या गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.