'सुंदरा'ची आता थेट रंगभूमीवर एन्ट्री; अक्षया नाईकचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 15:33 IST2023-09-14T15:07:00+5:302023-09-14T15:33:52+5:30
Akshayna naik: दोन अंकी असलेल्या या नाटकातील अक्षयाचा पहिला लूक नुकताच समोर आला आहे.

'सुंदरा'ची आता थेट रंगभूमीवर एन्ट्री; अक्षया नाईकचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. उत्तम अभिनयामुळे छोटा पडदा गाजवणारी अक्षया लवकरच रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. ज्येष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या नाटकातून अक्षया तिचा रंगभूमीवरील प्रवास सुरु करणार आहे. नुकतीच या नाटकाची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अक्षयाची मुख्य भूमिका असलेल्या या नाटकाची निर्मिती, भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. तसंच या नाटकाला अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे. दोन अंकी असलेल्या या नाटकातील अक्षयाचा पहिला लूक नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही या नाटकाचं नाव मात्र गुलदस्त्यात आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं. या नाटकाचं खूप कौतुकही झालं होतं. प्रभावळकर यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या या नाटकाला साधारणतः आता पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. मात्र हलकेफुलके असलेले हे नाटक आजही तितकेच ताजेतवाने आहे.
अक्षया नाईक "सुंदरा मनामध्ये भरली" या मालिकेतून घराघरात पोहोचली. पहिल्याच मालिकेत आव्हानात्मक भूमिका असल्यानं तिनं आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. त्यामुळे अक्षया सशक्त अभिनेत्री असल्याचं स्पष्ट झालं. या नाटकातील तिच्या भूमिकेबद्दल तिला विचारले असता तिने अजुन थोड़ी प्रतीक्षा करावी, असे तिने सांगितले. अक्षयाबरोबर नाटकात आणखी कोण कलाकार आहेत हे मात्र अजुन गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.