'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून दोन नवीन गायकांचे पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 08:00 AM2019-03-22T08:00:00+5:302019-03-22T08:00:00+5:30
या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.
मराठी चित्रपटांमध्ये अनेकानेक प्रयोग गेल्या काही वर्षांमध्ये होत आले आहेत. पण प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’च्या टीमने केलेला हा प्रयोग याआधी कुठे झालेला नाही. या चित्रपटातील एक गाणे हे चक्क ऑनलाइन ऑडीशनच्या माध्यमातून गायकांची निवड करून ध्वनिमुद्रित केले जात आहे. देश आणि परदेशातील गायकांकडून मिळालेल्या प्रतीसादानंतर तब्बल ४१२ गायक स्पर्धकांमधून दोघांची निवड हे गाणे गाण्यासाठी करण्यात आली असून त्याचे ध्वनीमुद्रण लवकरच होणार आहे. माजलगावचा सौरभ शिरसाठ आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे यांची निवड या गाण्यासाठी केली गेली आहे.
“कुनीबी कसंबी घालुदे पिंगा, बाशिंगाचा कळतोच इंगा.... कसा न कळला कधी न कळला, माझा बी जमलाय जोडा... माझ्या वेडिंगचा शिनेमा काढा...,” असे बोल असलेले हे गाणे हे कलाकार गाणार आहेत. सलील कुलकर्णी यांनी हे बोल फेसबुकलच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात ऑनलाइन टाकले आणि गाण्याचे व्हीडीओ अपलोड करायचे आवाहन होतकरू गायकांना केले. त्याला देश आणि परदेशातून म्हणजे अगदी ओमान, बाहरीन, अमेरिका, कॅनडा आदी देशांमधून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमधून आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून सर्व वयोगटातील होतकरू गायकांनी आपले व्हिडीओ अपलोड केले होते. पुरुष गायकांपेक्षा महिला गायकांचा प्रतिसाद अधिक होता. पुणे आणि त्याखालोखाल मुंबईतील गायकांनी या आवाहनाला सर्वाधिक प्रतिसाद दिला.
या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आणि स्वरूपा व सौरभ यांची निवड करत असल्याची घोषणा झाली. एव्हरेस्ट एंटरटेन्मेटची प्रस्तुती आणि गेरुआ व पीइएसबीची निर्मिती असलेला हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची तीन गाणी याआधीच प्रकाशित करण्यात आली आहेत तर ध्वनीमुद्रित होणारे हे चौथे गाणे आहे.
या वेगळ्या प्रयोगाला मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल डॉ सलील कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले आहे. “हे गाणे ऑडीशनच्या माध्यमातून गावून घेण्याचे आमचे ठरल्यावर संदीप खरेनेही ते त्याचप्रकारे लिहिले आहे. गेल्या आठवड्यात फेसबुकच्या माध्यमातून मी आवाहन केल्यानंतर १३ ते १६ मार्च या चार दिवसांमध्ये या आवाहनाला भरभरून प्रतिसाद लाभला. आज आम्ही त्यातील विजेत्यांची घोषणा केली. मला खूप आनंद होतोय की माजलगावचा सौरभ आणि कोल्हापूरची स्वरूपा हे धमाल गाणे गाणार आहेत,” ते म्हणाले.
डॉ सलिल कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली. पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर आणि दोन गाणी नुकतीच प्रदर्शित झाली होती. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. शिवाजी साटम, अलका कुबल, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर या आघाडीच्या कलाकारांबरोबरच भाऊ कदम, प्रवीण तरडे, हे कलाकारसुद्धा या चित्रपटात आहेत. या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.
‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरुआ आणि पीइएसबीची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-2, मुंबई पुणे मुंबई-3. बॉईज-2, बापजन्म, आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे.