'गणवेश'च्या तिकीट बारीवर हाऊसफुल्लच्या सरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2016 07:23 AM2016-06-27T07:23:14+5:302016-06-27T12:53:14+5:30
सैराटच्या धुंवाधार कमाई नंतर मराठी चित्रटपटांच्या बॉक्स ऑफिस आलेली मरगळ पुसण्याचे काम अतुल जगदाळे यांच्या 'विजयते एंटरटेनमेंट' निर्मित ...
सैराटच्या धुंवाधार कमाई नंतर मराठी चित्रटपटांच्या बॉक्स ऑफिस आलेली मरगळ पुसण्याचे काम अतुल जगदाळे यांच्या 'विजयते एंटरटेनमेंट' निर्मित आणि 'इरॉस इंटरनॅशनल' प्रस्तुत 'गणवेश' चित्रपटाने केले आहे. २४ जून रोजी भव्य प्रमाणात महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या 'गणवेश'ने पहिल्या दिवशीच 'बॉक्स ऑफिस'वर किमया साधत आता आपलेच राज्य असल्याचे सिद्ध करीत तब्बल ४८ शो हाऊसफुल्ल तर जवळपास ६५ शो ८० टक्के व उर्वरित सर्वच खेळांचे ५o टक्क्याहून अधिक कलेक्शन करून मराठी चित्रपटसृष्टीला ह्या पावसाळ्यातला पहिला गरम गारवा दिला आहे. प्रथम समीक्षकांनी गौरवल्यानंतर प्रेक्षांकडून मिळणार प्रतिसाद हा दर्जेदार कलाकृतींना उभारी देणारा असल्याची भावना चित्रपटाची कलावंत दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे, अतुल जगदाळे यांनी काढली.
राज्यात काल चित्रपट प्रदर्शित झाला आणि पावसानेही अचानक जोर धरला, त्यामुळे आमच्यात प्रेक्षक येतील का? याबाबत बरीच धाकधूक होती, पण समीक्षकांनी दिलेली पावती आणि जाहिरातींनी साधलेला प्रभाव उत्सुकता तयार करणारा असल्यामुळे हृदयाला भिडणाऱ्या 'गणवेश'ला प्रेक्षक नक्कीच दाद देतील याची खात्री होती, आमचा हा विश्वास रसिकांनी सार्थ ठरावीत काल पासून अभूतपूर्व प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे, अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी व्यक्त केली आहे. अभिनेते किशोर कदम म्हणाले की कोणतेही काम आपण मनापासून अगदी तल्लीन होऊन केले तर ते यश खेचून आणतेच, 'गणवेश'च्या बाबतीत मी असेच म्हणेन. जवळपास १५० जणांच्या गेल्या दोन वर्षांच्या अथक परिश्रमांच्या धारा आज पाहायला मिळाल्या आहेत, जीव ओतून केलेली दर्जेदार कलाकृती रसिकांनी स्वीकारली आहे त्याहून वेगळा आनंद तो काय असणार? गणवेशवर प्रेक्षक भरभरावून प्रेम करीत राहतील असे अभिनेत्री स्मिता तांबे यांनी व्यक्त केले.
'गणवेश' हा चित्रपट महाराष्ट्रात जवळपास २५० चित्रपगृहांमध्ये दररोज ४५० खेळामध्ये प्रदर्शित झाला आहे. सैराट नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झालेला बहुदा हा एकमेव चित्रपट असावा. नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर, चुझी अभिनेत्री मुक्ता बर्वे, गारवाकार व प्रसिद्ध कवी, अष्टपैलू अभिनेते सौमित्र उर्फ किशोर कदम, हुबेहूब व्यक्तिरेखा जिवंत करणारी गुणी अभिनेत्री स्मिता तांबे आणि चुणचुणीत बालकलाकार तन्मय मांडे, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे, जयंत सावरकर इत्यादी कलावंतांसोबत दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी ही किमया साधली आहे.