उपेंद्र दिसणार वकिलाच्या भूमिकेत, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:59 PM2019-10-31T12:59:01+5:302019-10-31T13:16:08+5:30
आपल्या दमदार अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका सक्षमपणे साकारणारे अभिनेते उपेंद्र लिमये आगामी ‘आक्रंदन’ या चित्रपटात सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आपल्या दमदार अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका सक्षमपणे साकारणारे अभिनेते उपेंद्र लिमये आगामी ‘आक्रंदन’ या चित्रपटात सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका कुटुंबावर काही जणांकडून अमानुष अत्याचार केले जातात त्यांची केस लढवायला कोणीही नसते. या पीडित कुटुंबाच्या वकिलाची भूमिका साकारताना उपेंद्र लिमये दिसणार आहेत. गोविंद मोतीराम आहेर निर्मित, शशिकांत देशपांडे लिखित-दिग्दर्शित ‘आक्रंदन’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वंदे मातरम फिल्मस’ चे विवेक पंडित या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून 'पार्वती पुत्र प्रॉडक्शन्स'च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना उपेंद्र सांगतात की, आदित्य जहागिरदार या वकिलाची व्यक्तिरेखा मी साकारत आहे. अतिशय प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ वकिलाची ही भूमिका आहे. वकिलांची देहबोली त्यांचे व्यक्तिमत्व याच्या निरीक्षणातून ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे. समाजात एखादी चुकीची घटना घडल्यानंतर त्याविरोधात तात्पुरता आवाज उठवला जातो. मात्र नंतर अशा घटना विसरल्या ही जातात. चित्रपटाच्या माध्यमातून अशा विषयांवर विचार मंथन होऊन बदल घडणार असतील तर असे चित्रपट आवर्जून यायला हवेत. हे चित्रपट आपल्याला किमान विचार करायला प्रेरित करीत असतात.
'आक्रंदन या चित्रपटात उपेंद्र लिमये यांच्यासोबत शरद पोंक्षे, मिलिंद इनामदार, विक्रम गोखले, गणेश यादव, बाळ धुरी, तेजश्री प्रधान, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या भूमिका आहेत. मिलन तारी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘आक्रंदन’ २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.