उर्मिला कानेटकर आता साकारणार ही आव्हानात्मक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 11:11 AM2016-12-19T11:11:03+5:302016-12-19T11:44:48+5:30

लाज धरा पाव्हनं जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?... असं म्हणत महाराष्ट्राच्या तमाम रसिकांवर हुकुमत गाजवलेली ‘तमाशासम्राज्ञी’ ...

Urmila Kanetkar is a challenging role to play | उर्मिला कानेटकर आता साकारणार ही आव्हानात्मक भूमिका

उर्मिला कानेटकर आता साकारणार ही आव्हानात्मक भूमिका

googlenewsNext
लाज धरा पाव्हनं जरा जनाची मनाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?...


असं म्हणत महाराष्ट्राच्या तमाम रसिकांवर हुकुमत गाजवलेली ‘तमाशासम्राज्ञी’ म्हणजे विठाबाई नारायणगांवकर.. वयाच्या अकराव्या वर्षापासून घुंगरांच्या तालावर नाचू लागलेल्या विठाबाईंनी वयाच्या सत्तरीपर्यंत महाराष्ट्रातील तमाशा फड गाजविला. ‘तमाशा’ या लोककलेला सरकार दरबारी व जनमानसात प्रतिष्ठा मिळवून देत या कलेसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. प्रचंड प्रसिद्धी, मानसन्मान आणि पैसा मिळवूनही उतारवयात त्याच्या पदरी निराशाच आली.
 
‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई नारायणगांवकर यांचे अलौकिक जीवन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘विठा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटाची निर्मिती ‘नम्रता एन्टरटेण्मेंट प्रा. लि.’ या चित्रपट निर्मिती संस्थेने ‘आपला पिक्चर’ या निर्मिती संस्थेच्या सहयोगाने केली आहे. नुकतेच ‘विठा’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन तांत्रिक सोपस्काराचे काम झपाट्याने हाती घेण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते दिनेश अग्रवाल, सौ. प्रितम दिनेश अग्रवाल, शुभदा भोसले आणि स्वतः पुंडलिक धुमाळ आहेत.

‘विठा’ चित्रपटात विठाबाई नारायणगांवकर यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेत्री उर्मिला कानेटकर- कोठारे यांनी साकारली असून सोबत उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘विठा’ चित्रपटाचे पटकथा – संवाद पुंडलिक धुमाळ आणि शंतनू रोडे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण सिनेमॅटोग्राफर संजय जाधव आणि देवेंद्र गोलतकर यांनी केले असून कलादिग्दर्शन महेश साळगांवकर यांचे आहे. ‘विठा’ या तमाशासम्राज्ञीचे जीवनपट उलगडणाऱ्या चित्रपटाचे   संगीत देखील तितकेच खास असणार आहे. अजित परब, समीर म्हात्रे आणि रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. फुलवा खामकर यांचे नृत्यदिग्दर्शन, अनिल पेमगिरीकर व महेश बराटे यांची रंगभूषा तर संजीव राजसिंह यांनी या चित्रपटाची वेशभूषा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाचे संकलन विजय खोचीकर करीत आहेत. पुंडलिक धुमाळ दिग्दर्शित ‘विठा’ सिनेमात आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या विठाबाईंच्या आयुष्यातील असंख्य पैलू पहायला मिळणार असून या चित्रपटाचे तांत्रिक सोपस्कार काम झपाट्याने पूर्णत्वास जात आहेत.

नवीन वर्षात ‘विठा’च्या निमित्ताने एक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना पहायला मिळेल हे नक्की !

Web Title: Urmila Kanetkar is a challenging role to play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.