मान्सून फुटबॉल या चित्रपटात उषा नाईक दिसणार या भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 04:44 PM2018-07-23T16:44:07+5:302018-07-23T16:44:53+5:30
नृत्य हा उषा नाईक यांचा बाज असला तरीही त्यांनी एक चॅलेंज म्हणून मान्सून फुटबॉल या चित्रपटात फुटबॉल खेळणाऱ्या एका महिलेची भूमिका स्वीकारली आहे. या चित्रपटात त्या एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार असून या भूमिकेसाठी त्या खूपच उत्सुक आहेत.
उषा नाईक यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्या आता मिलिंद उके दिग्दर्शित मान्सून फुटबॉल या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत सागरिका घाटगे, चित्राशी रावत, विद्या मालावडे, प्रीतम कांगणे, डेलनाझ इराणी आणि कविता अमरजीत या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
नृत्य हा उषा नाईक यांचा बाज असला तरीही त्यांनी एक चॅलेंज म्हणून मान्सून फुटबॉल या चित्रपटात फुटबॉल खेळणाऱ्या एका महिलेची भूमिका स्वीकारली आहे. या चित्रपटात त्या एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार असून या भूमिकेसाठी त्या खूपच उत्सुक आहेत. मान्सून फुटबॉल या चित्रपटाची कथा काही गृहिणींच्या आयुष्याभोवती फिरते. या गृहिणी समाजात आपले एक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी उषा नाईक सांगतात, मी आता गेली कित्येक वर्षं काम करतेय. माझी सुरुवात ग्रुप डान्सर म्हणून झाली आणि मी आजवर शंभर पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामे केली. आजवर मी जे कमावलं आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. मी नेहमीच माझ्या कामावर प्रेम केलं. मी माझे काम प्रामाणिकपणे करते. आजवर जरी मी अनेक भूमिका साकारल्या असल्या तरी मान्सून फुटबॉल मधील माझी भूमिका नक्कीच माझ्यासाठी एक वेगळी आहे. मला या वयात माझ्या क्षमता दाखवण्याची ही वेगळी आणि उत्तम संधी मिळाली आहे आणि मी त्याचे सोने केले आहे. ते माझ्या अभिनयातून प्रेक्षकांना दिसेलच. आजवर मी जे कमावलं ते माझ्या सकारात्मक विचारांमुळेच... मी नेहमीच आनंदी राहण्यात विश्वास ठेवते. मान्सून फुटबॉलचा भाग होताना आणि मिलिंद उके यांच्याबरोबर काम करताना मला खूप आनंद होतोय. जेव्हा मी या चित्रपटाची स्टोरी ऐकली, तेव्हा सर्व प्रथम माझ्या मनात एकच विचार आला की, कदाचित फुटबॉल खेळणे आपल्याला शक्य नाहीये. आपले पाय खूप दुखतील. पण मी विचार केला की, हा चित्रपट इतिहास घडवेल आणि माझा यातला खारीचा वाटा कुठल्याही दुखण्याला जुमाणार नाही”.