बापरे काय चाललंय! ७ दिवसांत संगीत क्षेत्रातील दोन तारे निखळले, वैभव मांगलेंची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:16 PM2024-01-13T12:16:32+5:302024-01-13T12:17:31+5:30
आठवड्याभरात संगीतातील दोन दिग्गज हरपल्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळी पसरली आहे. मराठी अभिनेता वैभव मांगले यांनीही याबाबत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
जेष्ठ प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वरयोगिनी प्रभा अत्रे (९२) यांचे आज शनिवारी(१३ जानेवारी) सकाळी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून खासगी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वीच ९ जानेवारीला शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक उस्ताद राशीद खान यांचही निधन झालं. आठवड्याभरात संगीतातील दोन दिग्गज हरपल्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळी पसरली आहे. मराठी अभिनेतावैभव मांगले यांनीही याबाबत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
वैभव मांगलेंनी प्रभा अत्रे यांचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. "स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे दुःखद निधन .
बाप रे काय चाललंय हे , आत्ताच राशिद खान गेले , आता प्रभा ताई . अभिजात भारतीय संगीताची भरुन न निघणारी हानी झालेय .ताई अद्वितीय होत्या. गाण्यात सरगमचा कसा प्रभावी वापर होतो...त्याचं स्थान किती महत्वाचं आहे...हे सौंदर्यात्मकदृष्ट्या सुद्धा त्यांनी पेपर लिहून सिद्ध केलं होतं...त्यांच्यासारखा कलावती कुणाचा झाला नाही आणि होणारही नाही. केवळ अप्रतिम. मारुबिहागही अतिउत्तम. पारायण केलीयेत या रागांची . प्रभा ताई तुम्हाला विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली," असं म्हणत वैभव मांगले यांनी प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जात होत्या. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. भारत सरकारने त्यांना संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये "पद्मश्री" आणि २००२ मध्ये "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित केले होते. हे पुरस्कार भारतातील अनुक्रमे चौथ्या तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. तसेच २०२२ मध्ये "पद्मविभूषण" देऊन त्यांचा गौरव केला. हा भारतरत्न नंंतर सर्वोच्च नागरी सन्मान आहे.