"विचारधारा जुळत नसली तरी पक्ष फोडून सत्तेत...", राजकारणावर वैभव मांगले स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 11:51 AM2023-08-12T11:51:50+5:302023-08-12T11:54:27+5:30
राजकीय परिस्थितीवर वैभव मांगलेंचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले, "सामान्य माणसाने..."
प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले अभिनयाबरोबरच त्यांच्या स्षष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या वैभव मांगलेंनी विविधांगी भूमिका साकारुन मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करुन त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘टाइमपास’, ‘अलबत्या गलबत्या’मधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. वैभव मांगले सोशल मीडियावरुन समाजातील घडामोंडीवर व्यक्त होताना दिसतात.
वैभव मांगलेंनी नुकतीच सौमित्र पोटेंच्या मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी राजकारणावरही भाष्य केलं. वैभव मांगलेंच्या “राजकारणात सगळं क्षम्य हे मान्य आहे का? राजकीय पक्षाला विचारधारा असावी का? दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर मतदान कोणाला करायचं?” या पोस्टवरुन मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी अगदी परखडपणे त्यांचं मत मांडले. ते म्हणाले, “एका बाजूला काही पक्ष विचारधारा असल्याचं सांगतात. ही आमची नियमावली आहे, असं सांगतात. या विचारधारेत हे लोक बसत नाहीत असं म्हणून आम्ही यांना बाद केलंय तुम्ही पण करा असं सांगायचं. आणि दुसऱ्या बाजूला तेच लोक फोडून आपल्यात सामील करुन घ्यायचे. आणखी तिसरा पक्ष सामील करुन घ्यायचा. मग विचारधारा कुठे जाते? राजकारणावर पोस्ट करायची नाही, असं मी ठरवलंय. कारण, आज आपण काहीतरी बोलतो आणि उद्या हे भलतंच काहीतरी करुन दाखवतात. सगळाच संभ्रम आहे.”
“चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे काही फोटो”, मुंबई-गोवा महामार्गाचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं ट्वीट
Gadar 2 : सनी देओलच्या ‘गदर २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून भाईजान थक्क, म्हणाला, “ढाई किलो का हाथ...”
“कलाकारांनी व्यक्त व्हावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कलाकारांनी व्यक्त व्हायलाच पाहिजे, असं मी म्हणणार नाही. कलाकार आणि माणूस म्हणून त्याची असलेली मतं यामध्ये गल्लत होता कामा नये. मानवतेला आणि समाजाला हानिकारक असलेली भूमिका जर कलाकाराने घेतली, तर तुम्ही बोला. पण, अमूक एका घटनेवर कलाकार बोलले नाहीत, हे तुम्ही म्हणू शकत नाही. कलाकार म्हणून मी माझं काम नीट करत नसेन, तर तुम्ही जरुर बोला. कलाकाराने केवळ राजकीय भूमिका घेऊ नये. किंवा राजकारणाशी संबंधित असलेल्या गोष्टींवर बोलायचं नाही. कारण, तुम्ही कोणत्या बाजूने बोललात तर तुम्ही तिकडचे होता, असा लोकांचा समज होतो. पूर्वी हे असं नव्हतं. आता हे खूप वाढलं आहे. माझ्या गावीही असं कधी वातावरण नव्हतं. २०१० पर्यंत या गोष्टींचा मागमूसही नव्हता. पण, आता वातावरण खूप गढूळ झालं आहे. सामान्य माणसाशी या सगळ्याचा काही संबंध नाही. त्याला १२० किलो भावानेच बाजारात भाजी मिळते. हे कुठले प्रश्न आणले आहेत, ज्याचा जगण्याशी काहीच संबंध नाही. मी कुठली भूमिका घेतली म्हणून किंवा घेतली नाही म्हणून काही फरक पडणार आहे का? मला भाजी १२० रुपयांनाच मिळणार आहे. मग सामान्य माणसाने या कशात पडू नये, अशी माझी कळकळीची विनंती आहे,” असंही ते म्हणाले.