भरत जाधवचे मोरूची मावशी हे नाटक पाहून वरद चव्हाणने फेसबुकला लिहिली ही पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:20 PM2019-03-23T15:20:31+5:302019-03-23T15:22:20+5:30
दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या भूमिकेमुळे 'मोरुची मावशी' हे नाटक रंगभूमीवर अजरामर ठरलं होतं. नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणे आणि त्यावरील नाच नाटकाचा महत्वाचा भाग होता.
आपल्या अभिनयाने भरत जाधवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. चित्रपट, रंगभूमी किंवा छोटा पडदा तिन्ही माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत भरत जाधवने आपल्या अभिनय कौशल्यातील अष्टपैलूत्व दाखवलं आहे. मात्र या तिन्ही माध्यमांपैकी रंगभूमीवरच भरत जाधवचं मन अधिक रमलं आहे. सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, पुन्हा सही रे सही, ऑल द बेस्ट अशा विविध नाटकांत त्याने भूमिका साकारल्या आहेत. रंगभूमीवरील त्यांचा वावर, कॉमेडीचं टायमिंग आणि अभिनयाची ताकद यामुळे नाट्यरसिकांचा तो लाडका अभिनेता बनला आहे.
दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या भूमिकेमुळे 'मोरुची मावशी' हे नाटक रंगभूमीवर अजरामर ठरलं होतं. नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणे आणि त्यावरील नाच नाटकाचा महत्वाचा भाग होता. रेशमी साडी सहजपणे सावरत विजय चव्हाण घालत असलेला पिंगा आणि कोंबडा कधीही न विसरता येणारा. या नाचासाठी त्यांना वन्समोअर मिळायचाच आणि विजय चव्हाणही वन्समोअर घेऊन त्याच उत्साहाने पुन्हा पिंगा आणि कोंबडा घालायचे. हेच नाटक गेल्या काही वर्षांपासून भरत जाधव सादर करत आहे. भरतने सादर केलेल्या या नाटकाच्या प्रयोगाला नुकताच विजय चव्हाण यांचा मुलगा वरद गेला होता. हे नाटक पाहिल्यानंतर वरदने एक खूप छान पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. वरदने लिहिले आहे की, काल भरत जाधव सरांची मोरूची मावशी बघायचा योग आला. देवाऱ्याच्या बाजूला बाबांची फोटो फ्रेम पाहून खरंच खूप बरं वाटलं. अप्रतिम नाटक... सगळ्यांचा अभिनय उत्तम... भरत काका तुझा विजू मामा नेहमीच तुझ्या पाठिशी आहे.
विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण सध्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयक्षेत्रात आपले भाग्य आजमावत आहे. वरदने ऑन ड्युटी 24 तास, धनगरवाडा यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच 100 डेज, लेक माझी लाडकी या मालिकेत तो झळकला होता. तो सध्या ललित 205 या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.