"सिनेमात स्विमसूट घालायला सांगितलं आणि...", वर्षा उसगावकर यांनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:08 AM2024-02-16T11:08:29+5:302024-02-16T11:09:27+5:30
"...तर मी कन्नडची सुपरस्टार असते", वर्षा उसगावकर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत
वर्षा उसगावकर या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी एक काळ गाजवला. आजही त्या कलाविश्वात कार्यरत आहेत. त्यांच्या सौंदर्यापुढे आजही तरुण पिढीतील कित्येक अभिनेत्री फिक्या पडतील. नुकतंच वर्षा उसगावकर यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं.
मराठी सिनेसृष्टी गाजवलेल्या वर्षा उसगावकर यांना कन्नड सिनेमाचीही ऑफर होती. पण सिनेमात स्विमसूट घालायला लागणार असल्यामुळे त्यांना हा चित्रपट केला नाही. हा किस्सा त्यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. त्या म्हणाल्या, "गंमत जंमत प्रदर्शित झाल्यानंतर कन्नड सिनेमाचे एक निर्माते मला भेटायला आले होते. अर्जुन नावाचा सिनेमा होता. आणि सुपरस्टार अंबरीश यांच्याबरोबर मला काम करायला मिळणार होतं. ते मला बेबी म्हणायचे. बेबी तुम्हाला थोडं जाड व्हावं लागेल, असं ते मला म्हणाले. त्यावेळी कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेत्री धष्टपुष्ट असायच्या. तू स्टार बनशील असं म्हणून ते मला तिकडे घेऊन गेले."
"त्या सिनेमात स्विमिंगसूट घालून मला अंबरीश यांच्याबरोबर एक गाणं करायचं होतं. ते बघूनच मला घाम फुटला. मी हे करू शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. मी दिग्दर्शकाबरोबर मीटिंग ठेवली. आणि मी त्यांना सांगितलं की ब्रह्मचारी हे माझं नाटक आहे. त्यात मी शॉर्ट्स घालते. मी तसं घालू शकते. पण, ते म्हणाले की नाही...स्विमसूट घालूनच हे गाणं करावं लागेल. १९८८-८९ मधली ही गोष्ट आहे. स्विमिंगसूटचं ऐकल्यानंतर दुसरी फ्लाइट पकडून मी आणि माझी आई गोव्यात पळून आलो. त्यावेळी माझे वडील म्हणाले की चित्रपटात काम करायचं ठरवलं आहेस तर हे करायला हवं होतंस. नाही का म्हणालीस? तुझी तयारी पाहिजे होती. ज्या वडिलांचा मला धाक वाटायचा..कोणी विरोध केला तर माझे वडिलच असतील, असं मला वाटायचं. तेच वडील मला हे सांगत होते. ते खूप फॉरवर्ड होते. ती व्यवसायाची गरज होती तर तू करायला पाहिजे होतं, असं ते मला म्हणाले," असंही पुढे वर्षा उसगावकर यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या, "मी तो सीन करायला हवा होता, असं मला वाटतं. त्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मी खूप आवडले होते. ते माझ्या मागे लागले होते. तो चित्रपट मी केला असता तर आज कन्नडची सुपरस्टारही झाले असते, ही खंत वाटते. त्यांनी मला आणखी एक खुशबू नावाचा सिनेमा दाखवला होता. हिरो सिनेमाचा तो रिमेक होता. त्या सिनेमातले बोल्ड सीन्स पाहून तर मी उडालेच होते. त्यांनी मला तिथे बोल्ड करायला नेलं होतं. पण, त्याचा माझ्यावर उलट परिणाम झाला."