"सात जन्मासाठी नाही, प्रत्येक जन्मासाठी...", प्रथमेश परबने पत्नीसह साजरी केली लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 14:23 IST2024-06-21T14:22:36+5:302024-06-21T14:23:00+5:30
क्षितीजाची लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. मोठ्या उत्साहात तिने वडाच्या झाडाची पूजा करत लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

"सात जन्मासाठी नाही, प्रत्येक जन्मासाठी...", प्रथमेश परबने पत्नीसह साजरी केली लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा
Vat Purnima 2024: ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी वडाची साग्रसंगीत पूजा करतात. त्याला वटसावित्री व्रत असे म्हणतात. वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले जाते. एक वटवृक्ष शंभर माणसांना शंभर वर्षे पुरेल एवढा प्राणवायू देतो. अशा ह्या वृक्षाची रोपे सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य असतील तेवढी द्यावीत, असे सांगितले जाते. यंदा शुक्रवारी(२१ जून) वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. अनेक सेलिब्रिटींचीही लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे.
अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. प्रथमेशने क्षितीजा घोसाळकरसह विवाह करून नव्या आयुष्याला सुरुवात केली. क्षितीजाची लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. मोठ्या उत्साहात तिने वडाच्या झाडाची पूजा करत लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. यासाठी क्षितीजाने खास गुलाबी साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत क्षितीजा वडाच्या झाडाची पूजा करताना दिसत आहे.
"फक्त सात जन्मासाठी नाही तर प्रत्येक जन्मासाठी तूच पाहिजेस...वडाच्या झाडासारखे आपले नाते दीर्घायुषी असावे...जन्मोजन्मी फक्त तुझीच सोबत असावी...वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा...सौ. क्षितिजा प्रथमेश परब", असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. प्रथमेश आणि क्षितीजाने २४ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.
दरम्यान, प्रथमेश परब हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'टाइमपास' सिनेमात मुख्य भूमिका साकारत प्रथमेशने अभिनयाची छाप पाडली. या सिनेमात त्याने साकारलेलं दगडू हे पात्र प्रेक्षकांच्या भलतंच पसंतीस उतरलं होतं. 'टाइमपास' चित्रपटामुळे प्रथमेश प्रसिद्धीझोतात आला. यानंतर अनेक सिनेमांमध्ये तो झळकला. मराठीबरोबरच हिंदीतही प्रथमेशने अभिनयाची जादू दाखवली आहे.