"... म्हणून मीडियाचे कॅमेरे पाहताच आमची मुलं हात जोडून नमस्कार करतात"; रितेश देशमुखनेच सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:37 PM2022-12-28T18:37:12+5:302022-12-28T18:42:27+5:30
मीडियाचे कॅमेरे पाहताच रितेश आणि जिनिलियाची मुलं हात जोडून सगळ्यांना नमस्कार करतात. त्यांचा हा अंदाज नेटिझन्सना खूप भावतो.
रितेश देशमुख (Riteish Deshmukh)- जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved Marathi Movie) हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी (30 डिसेंबर) रिलीज होतोय. रिलीजआधीच या सिनेमाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. वेडच्या निमित्ताने रितेश व जिनिलियाच्या पर्सनल लाईफमधील एक ना अनेक धम्माल किस्सेही ऐकायला मिळत आहेत. रितेश आणि जिनिलिया याची दोनही मुलं त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी उपस्थित असतात. मीडियाचे कॅमेरे पाहताच रिहान आणि राहिल हात जोडत सगळ्यांना नमस्कार करतात. त्यांचा हा अंदाज नेटिझन्सना खूप भावतो. ते असं का करतात यांचं कारण आता खुद्द रितेश आणि जिनिलियाने उघड केलं आहे.
या गोष्टीचा उलगडा करताना रितेश म्हणाला, एकदा माझ्या मुलांनी विचारलं ते तुमचं फोटो का काढतात?,रितेशनं यावर सांगितलं की, तुमचं आई-बाबा करत असलेल्या कामासाठी ते आमचं फोटो काढतात आणि तुम्ही आमची मुलं आहात म्हणून तुमचं देखील फोटो काढले जातात. म्हणून तुम्ही फक्त हात जोडून त्यांचे आभार मानायचे. आत्तपर्यंत तुम्ही असं काहीही केलेलं ही नाही की त्यांनी तुमचे फोटो काढावेत. तरीही ते तुमचं फोटो काढतात म्हणून तुम्ही त्यांचं हात जोडून आभार मानावेत. त्याचे हे म्हणणं मुलांना पटलं आणि त्यापासून ते फोटोग्राफर्स आणि मीडियासमोर आल्यावर सर्वांना हात जोडून नमस्कार करतात. असा खुलासा रितेशनं लोकसत्ताच्या कार्यक्रमा दरम्यान केला.
दरम्यान ‘वेड’ या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. शिवाय त्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हीदेखील या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतेय. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची खास झलकही यात पाहायला मिळणार आहे. ‘वेड लावलंय’ हे गाणं अजय गोगावणे आणि प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी गायलं आहे. या गाण्यातील सलमान आणि रितेशची केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांना वेड लावत आहे. ‘वेड’ चित्रपटात रितेशसह जिनिलीया देशमुख, अशोक सराफ, जिया शंकर, विद्याधर जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.