Ved Marathi Movie : 'वेड तर हिट झाला पण...' लोकांची रितेशकडे एक वेगळीच तक्रार, काय आहे तक्रारीचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:06 AM2023-01-16T10:06:09+5:302023-01-16T10:08:24+5:30
वेड च्या यशानंतर लोक मात्र रितेश आणि जिनिलियावर नाराज दिसत आहेत. त्यांनी रितेशकडे तक्रारच केली आहे.
Ved Marathi Movie : मराठी सिनेमा 'वेड' ला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) चाहत्यांना आणखी एक सरप्राईज देणार आहे. 'वेड' तर हिट झाला, सत्या आणि श्रावणीची जोडीही आवडली मात्र दोघांवर एकही रोमॅंटिक सॉंग नाहीए असं लोकं म्हणत आहेत. त्यामुळे आता हॅपिली एव्हर आफ्टरनंतर सत्या आणि श्रावणीचं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रितेशने एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो आणि सहकलाकार शुभंकर तावडे एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. तेव्हा शुभंकर रितेशला म्हणतो, 'सिनेमा तर हिट झाला पण सत्या आणि श्रावणीचं पुढे काय झालं ?' यावर रितेश म्हणतो , 'काय झालं हॅपिली एव्हर आफ्टर. यावर शुभंकर सांगतो, लोकं पण वेडे आहेत.लोकं म्हणताएत सत्या आणि श्रावणीचं असं काही रोमॅंटिक गाणंच नाहीए. आता गाणं कर.' शुभंकरच्या या बोलण्यावर रितेशही विचारात पडतो. त्यालाही पटतं सत्या आणि श्रावणीचं एक रोमॅंटिक गाणं असायलाच पाहिजे.
आता चाहत्यांसाठी रितेश जिनिलियाचं रोमॅंटिक गाणं लवकरच भेटीला येत आहे. लोकांच्या आग्रहास्तव सत्या आणि श्रावणीची प्रेमककहाणी गाण्यात दिसणार आहे. सिनेमात शेवटी दोघंही एकत्र येतात मात्र नंतर त्यांच्यावर एकही गाणं नाही अशी गोड तक्रार लोकांनी केल्यानंतर आता वेडच्या आणखी एका गाण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
विक्रमावर विक्रम...
एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने कधीच मोडीत काढला. रिलीजच्या दुसऱ्या रविवारी 'वेड'ने ५.७० कोटींची कमाई केली. व्यावसायिकदृष्ट्या सुपरडुपर हिट ठरलेल्या ‘सैराट’नं कोणत्याही दिवशी एवढी कमाई केली नव्हती. मीडिया रिपोर्टनुसार ‘सैराट’ची सर्वाधिक कमाई ४.६१ कोटींची होती. मात्र ‘सैराट’चा हा रेकॉर्ड 'वेड'ने मोडला. ‘लय भारी’ हा रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होता. पण ‘वेड’ने त्यालाही मागे टाकलं. आता ‘वेड’ आणखी एका विक्रमावर नाव कोरलं आहे. चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. पहिलं स्थान अर्थातच ‘सैराट’कडे आहे.