Vedat Marathe Veer Daudale Saat : माती खाल्ली... मराठी कलाकार नाही दिसले का? अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून संतापले नेटकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:28 PM2022-11-03T12:28:12+5:302022-11-03T12:28:38+5:30
Vedat Marathe Veer Daudale Saat, Akshay Kumar : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेटकऱ्यांना मात्र ही निवड फारशी आवडलेली नाहीये...
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. एकापाठोपाठ एक अशा ऐतिहासिक चित्रपटानंतर आता महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar ) आणखी एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा केली आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) असं या चित्रपटाचं नाव आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि घोषणा होताच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. या चर्चेला कारण ठरला तो अक्षय कुमार.
होय, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेमक्या याच गोष्टीची सर्वाधिक चर्चा आहे. मांजरेकरांची छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी अक्षयची निवड केली असली तरी नेटकऱ्यांना मात्र ही निवड फारशी आवडलेली नाहीये. त्यामुळे सध्या मांजरेकर आणि अक्षयला ट्रोल केलं जात आहे.
अनेकांनी अक्षय कुमार हा शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ‘फिट’ नसल्याचं म्हटलं आहे. या भूमिकेसाठी महेश मांजरेकरांनी बॉलिवूडचा अभिनेता का निवडावा? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
‘माती खाल्ली... आपले मराठी कलाकार नाही दिसले का?’, असा संतप्त सवाल एका युजरने केला आहे. अक्षय कशाला? मराठी कलाकार संपले वाटतं? अशी कमेंट एका युजरने केली आहे. सर्व खोटे लोक़... छत्रपतींच्या नावावर स्वत:ची पोळी भाजता आणि आपल्या मराठी माणूस त्यांना पुढे पुढे करतो, असं एकाने लिहिलं आहे.
अनेकांनी अक्षय कुमार या सिनेमाचं वाटोळं करेल, अशा कमेंट करत अक्षयला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
अक्षय कुमारला अॅक्टिंग सुद्धा येत नाही. पृथ्वीराज चौहान मुव्हीचं काय वाटोळं केलं, अशी कमेंट एका युजरने दिली आहे. यापेक्षा वाईट चॉईस काहीही असू शकत नाही, अशी कमेंटही पाहायला मिळते आहे. शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी मराठी रक्त असायला हवं. चिन्मय मांडलेकर, शरद केळकर... आणखीही अनेक पर्याय आहे, अशा भावना एका युजरने व्यक्त केल्या आहेत. तू नाही शोभणार या रोलमध्ये, का स्वत:ची शोभा करून घेतो आहेस, अशा आशयाची कमेंट एका युजरने केली आहे.
मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली....
काल चित्रपटाच्या घोषणा करण्यात आली, यावेळी अक्षय कुमारने हा सिनेमा स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं. ‘मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असं मला राज ठाकरे म्हणाले. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन,’असं तो म्हणाला.
‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि तुज्यात जीव रंगला अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे.