न भूतो न भविष्यती...; महेश मांजरेकर घेऊन येत आहेत मराठीत सर्वाधिक महागडा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 02:40 PM2022-05-01T14:40:44+5:302022-05-01T14:41:20+5:30
Mahesh Manjrekar Upcoming Movie : आज महाराष्ट्र दिनाचे मुहूर्त साधत महेश मांजरेकरांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं एक पोस्टरही त्यांनी शेअर केलं आहे.
Mahesh Manjrekar Upcoming Movie : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, सूत्रसंचालक अशी ओळख असलेले महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. दमदार अभिनयासोबतच दमदार कलाकृती देणारे महेश मांजरेकर आता एक नवा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. आज महाराष्ट्र दिनाचे मुहूर्त साधत त्यांनी या नव्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं एक पोस्टरही त्यांनी शेअर केलं आहे.
महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाचं नाव आहे, ‘वीर दौडले सात’. (Veer Daudale Saat) ‘इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार, न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम ...,’ असं त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे.
विशेष म्हणजे, ही मराठीतील आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती असेल, असंही त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका कोण साकारणार, याबद्दलही उत्सुकता पाहायला मिळतेय़ प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत, त्यांच्या या आगामी प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हा इतिहास बघणारा फक्त बघणार नाही तर जगणार आहे. भव्य इतिहास, भव्य पडद्यावर,’अशी प्रतिक्रिया उत्कर्ष शिंदेनं केली आहे.
हिंदीतही येणार...
महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे पोस्टर हिंदीतही शेअर केलं आहे. ‘वो सात’ असं हिंदी भाषेतील पोस्टरला नाव देण्यात आलं आहे. यावरून त्यांचा हा चित्रपट एकाचवेळी मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आई, दे धक्का, पु. ल. देशपांडे, नटसम्राट अशा मांजरेकरांच्या प्रत्येक चित्रपटाने चाहत्यांना वेड लावलं़ त्यांच्या काही चित्रपटांमुळे मोठा गदारोळही झाला. लालबाग परळ, वरनभात लोन्चा यांसारख्या चित्रपटामुळे मोठे वादंग झाले.