"समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजणं..." अतुल परचुरेंचा मैत्रीची व्याख्या सांगणारा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 08:57 AM2024-10-15T08:57:39+5:302024-10-15T09:02:55+5:30
मराठी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांच्या अकाली निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Atul Parchure Video : मराठी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure ) यांच्या अकाली निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विनोदी भूमिकांनी आपल्याला हसवले, तर अनेक भावनांनी स्पर्शही केला. अतुल परचुरे यांना २०२२ साली कर्करोग असल्याचे निदान झालं होतं. यावर त्यांनी उपचारदेखील सुरु केले. त्यानंतर या गंभीर आजारावर मात करत ते त्यातून सुखरुप बाहेर पडत त्यांनी पुन्हा अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते. अशातच आज (१४ ऑक्टोबर) या दिवशी अभिनेत्याने वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी व त्यांच्या कुटुंबियांवरही दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
सध्या सोशल मीडियावर अतुल परचुरेंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. झी मराठी वाहिनीवरल 'कानाला खडा' या कार्यक्रमामध्ये अभिनेते संजय मोने यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखती दरम्यान त्यांनी मैत्रीचा खरा अर्थ पटवून दिला होता. त्या मुलाखतीत अभिनेते अतुल परचुरे म्हणाले, " आपण समोरच्यासाठी काय आहोत किंवा समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्त्वाचं असतं. त्यात जर गल्लत झाली तर फार गडबड होऊ शकते. म्हणजे तुम्ही एखाद्याला, समोरच्या व्यक्तीला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो तुम्हाला फक्त टाईमपास समजतो. सहज कोणासाठी उपलब्ध असणं हा जर तुमचा गुण असेल आणि त्याने तुम्हाला फोन केला की तुम्ही त्याच्या मदतीसाठी समोर उभे राहता, त्याच्यासाठी उपलब्ध राहता. त्याने तुम्हाला बोलावलेलं असतं कारण तुम्ही काहीतरी खूप चांगलं बोलता, छान हसवता. परंतु, ज्यावेळी त्याला कोणाबरोबर वेळ घालवायचा आहे याची निवड करण्याची त्याला संधी असते किंवा त्याच्यावर अशी वेळ येते तेव्हा तो ठरवून दुसऱ्या लोकांना भेटतो, दुसऱ्या लोकांची निवड करतो. त्यांच्याबरोबर वेळ घालवतो आणि तुम्हाला जेव्हा त्याला भेटायचं असतं तेव्हा तो तुम्हाला वेळ नाही असं सांगतो, तेव्हा असं वाटतं की आपलं कुठेतरी चुकतंय. त्यामुळे समोरच्यासाठी आपण काय आहोत हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे".
दिलखुलास, रसिकांना हसवणारे व्यक्तिमत्व मराठी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या केवळ ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'आम्ही आणि आमचे बाप' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. शिवाय 'आर के लक्ष्मण की दुनिया', 'जागो मोहन प्यारे' सारख्या हलक्याफुलक्या मालिकेत काम केलं. त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा 'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं. आता ते पुन्हा 'सूर्याची पिल्ले' या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.