Jayant Sawarkar passed away : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:20 PM2023-07-24T12:20:38+5:302023-07-24T12:21:03+5:30
Jayant Sawarkar passed away : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले होते.
जयंत सावरकर आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून घराघरात पोहचले. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे, १९३६ रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षी, म्हणजे १९५५पासून चेहऱ्याला रंग लावून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी छोटी मोठी कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही.
‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम आदींच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर वावरण्याची संधी मिळाली. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली. ते नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. ते मूळचे गिरगावकर आणि नुकतेच ठाण्यात वास्तव्यास आले होते. मे २०२३ मध्ये अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.