ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 09:06 AM2020-12-06T09:06:14+5:302020-12-06T09:20:46+5:30
Ravi Patwardhan News: रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
ठाणे : मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला. अगबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्र्ह बॅंकेत नोकरी करत होते. वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते. बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती.
आज अंत्यसंस्कार
काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्चमध्येही त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंड असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.