रवी पटवर्धन यांनी 80 व्या वर्षी दिली होती परीक्षा, आले होते पहिले...! ‘तेजाब’मध्ये होते नुसते दोन सीन्स पण...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 10:36 AM2020-12-06T10:36:28+5:302020-12-06T11:07:07+5:30
वयपरत्वे शारीरिक मर्यादा आल्यात, पण रवी पटवर्धन यांनी त्यांच्यापुढे हार मानली नाही...
माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मृत्यू अटळ आहे. पण मी मृत्यूला लांब उभे राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे, असे म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे काल निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणायला ‘मृत्यू’ जिंकला, पण म्हणून रवी पटवर्धन यांची ‘जिद्द’ हरली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत ते मृत्यूला झुंज देत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत सकारात्मक राहिले, हाच त्यांचा विजय.
वयपरत्वे शारीरिक मर्यादा आल्यात, पण रवी पटवर्धन यांनी त्यांच्यापुढे हार मानली नाही. अखेरपर्यंत ते काम करत राहिले.
लोकसत्ताला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत रवी पटवर्धन गमतीने एक वाक्य म्हणाले होते. पण ते वाक्य त्यांनी आयुष्यभर कसोसीने पाळले आणि त्याच जोरावर मृत्यूने गाठेपर्यंत रंगभूमीची सेवा करत राहिले. ‘माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरीही मी ठाम उभा आहे. मृत्यू अटळ आहे. पण औषधं, तपासण्या, व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या जोरावर मृत्यूला लांब उभं राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे. माझा देवावर नव्हे, नियतीवर विश्वास आहे. सत्कर्मावर विश्वास आहे. पेराल ते उगवते...या सिद्धांतावर माझी नितांत श्रद्धा आहे,’असे रवी पटवर्धन या मुलाखतीत म्हणाले होते. त्यांचे हे शब्द अनेक थकलेल्या जीवांना नवी उमेद देणारे होते.
तेजाब सिनेमात नुसते दोन सीन्स पण....
‘तेजाब’ या सिनेमात रवी पटवर्धन यांच्या वाट्याला केवळ दोन सीन्स आले होते. पण तरीही हा सिनेमा केल्याचा अभिमान आणि समाधान रवी पटवर्धन यांच्या चेह-यावर अखेरपर्यंत होते. याच मुलाखतीत त्यामागचे कारण त्यांनी सांगितले होते. ‘ तेजाब चित्रपटाला 35 वर्षे झाली आहेत आणि त्यात मी अवघे दोन सीन्स केलेत. पण आजही रिक्षात बसलो आणि रिक्षावाल्याने मला ओळखले की तो त्या चित्रपटातले संवाद म्हणून दाखवतो तेव्हा मला खूप बरे वाटते,’ असे ते म्हणाले होते.
ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड
शरिराला कंप आला होता तरीही...
वाढत्या वयामुळे रवी पटवर्धन यांच्या डाव्या हाताला किंचित कंप आला होता. पायावर व्हेरिकोज व्हेन्सची शस्त्रक्रिया झाल्याने फार वेळ उभा राहण्यावर मर्यादा आली होती. गात्र थकली होती. पण कायम होता तो आत्मविश्वास, कामाबद्दलची अफाट ओढ. याच जोरावर 82 व्या वर्षी रवी पटवर्धन रंगभूमीवर उभे राहिले होते. इतका वेळ हे उभे राहू शकतील का? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला होता. पण रवी पटवर्धन यांच्या मनात क्षणभरही हा विचार आला नाही. याचे कारण काय तर, वाढत्या वयानुसार आलेल्या कमतरतांचा त्यांनी ‘पॉझिटीव्ह पॉईन्ट्स’ म्हणून वापर केला होता. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही वर्षांपूर्वी श्याम मानव यांच्याकडून ते स्वसंमोहन शास्त्र शिकले होते आणि याच शास्त्राचा वापर करून त्यांनी अनेक व्याधींवर मात केली होती.
80 व्या वर्षी परीक्षा दिली अन् पहिले आलेत....
मध्यंतरीच्या काळात रवी पटवर्धन यांच्याकडे नवे काम येईना. पण ते नाऊमेद झाले नाहीत. या काळात त्यांनी काय करावे तर संस्कृत आणि ऊर्दूचा अभ्यास केला. केवळ इतकेच नाही तर 80 व्या वर्षी भगवद्गगीतेचे 700 श्लोकपाठकरून श्रृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. या परीक्षेच्या वेळी ते खूप आजारी पडले. पण तरीही ते परीक्षेला गेलेत आणि त्यात ते पहिलेही आलेत.