ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 07:17 PM2018-08-23T19:17:21+5:302018-08-23T19:17:35+5:30

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती फोर्टीस रूग्णालयाने दिली आहे. काल बुधवारी मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Veteran actor Vijay Chavan's condition is critical | ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती फोर्टीस रूग्णालयाने दिली आहे. काल बुधवारी मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर काल विजय चव्हाण यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. तूर्तास त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रूग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे फोर्टीसने म्हटले आहे.
विजय चव्हाण त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले़ मोरूची मावशी या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्री पात्र प्रेक्षक कधीचं विसरू शकत नाहीत़ गेल्या कित्येक दिवसांपासून विजय चव्हाण आजारी आहेत. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत सुधारली होती. पण आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले होते.
विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

 

Web Title: Veteran actor Vijay Chavan's condition is critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.