“वर्षभरापूर्वी बाबा गेले अन्…”आईच्या निधनानंतर अजिंक्य देव भावूक, म्हणाला-तिच्या जाण्याने ...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 03:20 PM2023-08-24T15:20:22+5:302023-08-24T15:21:51+5:30
सीमा देव आणि दिवंगत अभिनेते रमेश देव यांची अजिंक्य व अभिनय ही मुलेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.
मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमरने ग्रासलं होतं. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२२मध्ये सीमा देव यांचं पती आणि अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सीमा देव यांचा मुलगा अजिंक्य देवने दु:ख व्यक्त करत कुटुंबात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाल्याची खंत बोलवून दाखवली आहे.
आज माझी आई सीमा देव यांचं निधन झालं. सकाळी सात वाजता ती गेली. गेली तीन ते चार वर्ष ती अल्झायमरशी झुंज देत होती. पूर्ण विस्मृती तिला झाली होती. बाबांना जाऊन आता कुठे एक दिड वर्ष झालं होतं”.
“आईला काही आठवत नव्हतं, तिला काही कळत नव्हतं पण ती होती. पण आज दोघंही नाहीत. एवढी मोठी पोकळी कुटुंबामध्ये निर्माण झाली आहे की, मी बोलू किंवा सांगू शकत नाही”. अजिंक्य देवने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
सीमा देव यांनी १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांनी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यांचे ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट प्रचंड गाजले. त्यांनी मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं होतं. सीमा देव व रमेश देव यांची अजिंक्य व अभिनय ही मुलेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.