VVIP रूमची रंगरंगोटी करून काय उपयोग? नाट्यमंदिरांच्या दुरवस्थेबाबत शरद पोंक्षे यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 12:32 IST2025-01-05T12:26:05+5:302025-01-05T12:32:16+5:30

रविवारी एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने व्हीव्हीआयपी कक्षाची रंगरंगोटी

Veteran Marathi Actor Sharad Ponkshe expressed displeasure over painting the VVIP room as drama theatres in Kalyan Dombivli are in poor condition | VVIP रूमची रंगरंगोटी करून काय उपयोग? नाट्यमंदिरांच्या दुरवस्थेबाबत शरद पोंक्षे यांची नाराजी

VVIP रूमची रंगरंगोटी करून काय उपयोग? नाट्यमंदिरांच्या दुरवस्थेबाबत शरद पोंक्षे यांची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याणमधील अत्रे रंगमंदिराच्या दुरवस्थेबाबत ज्येष्ठ नाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. रविवारी एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे येणार असल्याने व्हीव्हीआयपी कक्षाची रंगरंगोटी केली जात आहे. मात्र, नाट्यगृहातील खुर्च्या तुटलेल्या आहेत. काही बल्ब बंद आहेत. अशीच दुरवस्था डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची आहे. नाट्यगृहाच्या देखभालीत लक्ष घालावे याकरिता सांगूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत पोंक्षे यांनी व्यक्त केली. पोंक्षे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

अत्रे रंगमंदिरात शनिवारी पुरुष नाटकाचा प्रयोग होता. या प्रयोगाच्या आधी पोंक्षे मेकअप रूममध्ये गेले तेव्हा त्याठिकाणी एक कामगार रंगरंगोटी करीत होता. त्याला पोंक्षे यांनी नाट्यप्रयोग असल्याचे सांगितल्यानंतर तो निघून गेला. अत्रे रंगमंदिरात प्रेक्षक तिकीट काढून नाटकाला येतात. याठिकाणी ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला नाटक पाहण्याकरिता येतात; पण त्यांच्याकरिता बाहेर बसण्याची व्यवस्था नाही. रंगमंदिरातील खुर्च्या तुटलेल्या आहेत. रविवारी मुख्यमंत्री येणार असल्याने व्हीआयपी रूमची डागडुजी केली जाते. मुख्यमंत्री आल्यावर त्यांना वाटते की, नाट्यगृह छान आहे. मात्र मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि अन्य खात्याचे मंत्री यांनी अचानक रंगमंदिरांना भेट देऊन पाहणी करावी, असे पोंक्षे म्हणाले. 

रंगमंदिरांना आचार्य अत्रे आणि सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले आहे. त्यांच्या कार्याविषयी भाषणात बोलतो. त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतो; पण थोरामोठ्यांची नावे दिलेली रंगमंदिरे नीट ठेवू शकत नसाल तर त्यांची नावे देऊन त्यांच्या नावाला काळिमा तरी फासू नका. त्याऐवजी रंगमंदिराना अ, ब, क, ड अशी नावे द्या, अशा शब्दांत पोंक्षे यांनी राग व्यक्त केला.

‘बोलण्याने फरक पडेल असे वाटत नाही’

महापालिकेने दोन्ही रंगमंदिरे कंत्राटदाराच्या हाती दिली आहेत. येथे कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळत नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझ्या बोलण्याने काही फरक पडेल असे मला वाटत नाही. कारण, पोंक्षे प्रयोगाला आले. ते बोलले आणि प्रयोग करून निघून गेले, अशी प्रशासनाची मानसिकता आहे, असे ते म्हणाले. 

सध्या देखभाल दुरुस्ती सुरू

महापालिकेचे उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले की, अत्रे रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. या कामाचा कार्यादेश काढण्यात आला आहे. पावसाळ्यात काम करणे शक्य नव्हते. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागली.  देखभाल दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीकरिता स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्यानुसार दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

Web Title: Veteran Marathi Actor Sharad Ponkshe expressed displeasure over painting the VVIP room as drama theatres in Kalyan Dombivli are in poor condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.