"ऑडिशन्स दिल्या पण न सांगताच रिप्लेस...", दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या मुलाने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:37 IST2025-01-02T14:33:48+5:302025-01-02T14:37:11+5:30
इंडस्ट्री गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या मुलाची कामासाठी धडपड, म्हणाला...

"ऑडिशन्स दिल्या पण न सांगताच रिप्लेस...", दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या मुलाने व्यक्त केली खंत
Varad Chavan: मराठी सिनेसृष्टीसह, रंगभूमी गाजवणारे अभिनेते विजय चव्हाण (Vijay Chavan) यांचं नाव कलाविश्वात आजही मोठ्या आदराने घेतलं जातं. वेगवेगळ्या मराठी चित्रपटांसह, नाटकांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'टांग टिंग टिंगाक' म्हणत आपल्या तालावर प्रेक्षकांना नाचवणाऱ्या या अभिनेत्याने २०१८ मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत मुलगा वरदने देखील अभिनय क्षेत्राची वाट धरली. परंतु इंडस्ट्रीत काम मिळण्यासाठी धडपड करावी लागते, असा खुलासा विजय चव्हाण यांच्या मुलाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
नुकतीच वरद चव्हाणने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने संघर्षकाळावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत वरद म्हणाला, "२००९-१० मध्ये मी माझ्या करिअरची सुरूवात केली. तर तेव्हापासून आतापर्यंत काम करताना मी बाबांची ओळख कधीच सांगितली नाही. जेव्हा मी बाबांना सांगितलं होतं की, मला अभिनय क्षेत्रात यायचं आहे. तेव्हा बाबा मला म्हणाले होते सर्वात आधी तू डिग्री घे त्यानंतर या क्षेत्रात पाऊल ठेवं... आणि माझ्याकडून तू कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. मी तुला चॉन्च करेन तुझ्यासाठी मी फायनान्सर्सकडे जाईन अशी कुठलीही अपेक्षा तू माझ्याकडे ठेऊ नकोस. त्यानंतर मी माझं 'बीएससी कॉम्प्युटर सायन्स'मध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी बऱ्याचदा बाबांबरोबर सेटवर जायचो. तिकडे असलेल्या दिग्दर्शक, निर्माते तसेच लेखकांना भेटायचो. असं करत मी बाबाचं ज्या ठिकाणी शूट असायचं तिकडे जाऊन मी दिग्दर्शक, निर्मात्यांना भेटून माझे फोटो वगैरे द्यायचो. "
पुढे वरद चव्हाण म्हणाला, माझं बाबांबरोबर सेटवर जाणं वाढलं त्यामुळे लोक बोलायचे की, विजय चव्हाणांनी 'स्पॉटबॉय' ठेवलाय वाटतं? लोकांच्या अशा कमेंट्सदेखील मी ऐकल्या आहेत. पण, हेच मी त्यांच्या मुलांच्या बाबतीत बोललो असतो तर त्यांना काय वाटलं असतं? जेव्हा बाबासोबत मी सेटवर जायचो समोरच्या लोकांना समजायचं मी विजय चव्हाण यांचा मुलगा आहे तेव्हा अनेकदा का क्षेत्रात येतोय? असं ते मला म्हणायचे, मग त्यांची ‘न’ ची बाराखडी सुरू व्हायची."
काम मिळत नसल्याने वरदने व्यक्त केली खंत
"माझ्या आयुष्यात काम न मिळण्याच्या दोन फेझ आल्या. एक फेझ अशी होती जेव्हा २०१५ मध्ये वर्षभर मला कोणाचे कॉलच येत नव्हते, त्यानंतर मला आता आपलं करिअर संपलं, असं वाटू लागलं. पण, बाबा मला कायम मोटिव्हेच करायचे. त्यानंतर २०२२ मध्ये 'आई मायेच कवच' ही मालिका संपल्यापासून गेल्या दोन वर्षात मी प्रचंड संघर्ष केला. या दोन वर्षात माझा एक वेगळा स्ट्रगल चालू होता. कॉल येतायत ऑडिशन्स होतायत, ऑडिशन्स झाल्यानंतर थांबवलं जातं की दुसरं काही काम घेऊ नको. मग परस्पर कळतं आपल्याला रिप्लेस करण्यात आलं आहे."
"स्ट्रगल करायला माझी काहीच हरकत नव्हती. मला माहिती होतं की आपला प्रवास खडतर आहे. माझं इतकंच म्हणणं आहे की मला काम द्या, माझी कोणतीही अपेक्षा नाही. मला साजेशी अशी कोणतीही भूमिका मी करेन. ऑडिशन सुद्धा देतो. कारण, आजकाल अनेक लोक ऑडिशन देत नाहीत पण, माझा तो सुद्धा हट्ट नाहीये. मला भरपूर काम करण्याची इच्छा आहे यासाठी काम मिळालं तर पाहिजे." असं म्हणत वरदने मनातील खंत व्यक्त केली.