मतदार यादीत नाव नोंदवा, पण...; विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत ढोमेचं चाहत्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:55 PM2024-10-19T15:55:25+5:302024-10-19T15:55:55+5:30
राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मराठी अभिनेत्याने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलं आहे.
सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. एका महिन्यावर निवडणुका आलेल्या असताना सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं दिसत आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मराठी अभिनेत्याने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलं आहे.
हेमंत ढोमे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. 'झिम्मा', 'बघतोस काय मुजरा कर', 'झिम्मा २', 'ये रे ये रे पैसा २' असे सुपरहिट सिनेमे त्याने सिनेसृष्टीला दिले. अभिनयाबरोबरच हेमंत त्याच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठीही ओळखला जातो. समाजातील अनेक घडामोडींवर हेमंत ढोमे त्याचं स्पष्ट शब्दांत मत मांडताना दिसतो. आतादेखील हेमंतने निवडणुकांआधी त्याच्या चाहत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
हेमंतने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमधून त्याने चाहत्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे. "मतदार यादीत आपलं नाव आहे ना याची खात्री करून घ्या! अथवा आजच नाव नोंदवा, पण मतदान नक्की करा", असं या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकांवेळी अनेक मतदारांची यादीत नावे नसल्याने त्यांना मतदान करता आलं नव्हतं. काही सेलिब्रिटींचाही यात समावेश होता. याबाबत सेलिब्रिटींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर २३ तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत राजकीय पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे.