‘फर्जंद’ पाहताना प्रेक्षकांना होईल बाहुबलीची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 04:14 AM2018-05-29T04:14:25+5:302018-05-29T09:56:07+5:30

भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक विक्रमांवर नाव कोरणाऱ्या 'बाहुबली'  या चित्रपटातील भव्यदिव्यता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळेच बाहुबलीला ‘न भूतो ...

In view of 'Firzand', the audience will be reminded of Bahubali | ‘फर्जंद’ पाहताना प्रेक्षकांना होईल बाहुबलीची आठवण

‘फर्जंद’ पाहताना प्रेक्षकांना होईल बाहुबलीची आठवण

googlenewsNext
रतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक विक्रमांवर नाव कोरणाऱ्या 'बाहुबली'  या चित्रपटातील भव्यदिव्यता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळेच बाहुबलीला ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमानंतर अशा प्रकारच्या भव्य-दिव्य सिनेमांची स्वप्नं अनेकांना पडू लागली असताना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या मातृभाषेतील मराठी सिनेसृष्टीने एक पाऊल पुढे टाकत बाजी मारली आहे. ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमाचे प्रोमोज पाहून बाहुबली सिनेमाची आठवण झाली असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. फर्जंद चित्रपटाची भव्यता ट्रेलरमध्ये दाखवलेल्या पिक्चरायझेशन, डायलॉग, म्युझिकवरून दिसून येते.

एखाद्या चित्रपटामध्ये ऐतिहासिक कथानक साकारायचे म्हणजे पडद्यावर तो काळ जसाच्या तसा उभारणे गरजेचे असते. त्यात अगदी त्या काळातील शहरे, वास्तू हुबेहूब साकारणे हे मोठे आव्हान असते. पण त्यासोबतच व्यक्तिरेखांची वेशभूषाही त्या काळाला अनुसरून करणे हे तो काळ जिवंत करण्यासाठी आवश्यक असते. यासाठी प्रचंड, भव्य कॅनव्हास गरजेचा असतो. दिग्पाल लांजेकर या होतकरू लेखक-दिग्दर्शकाने शिवकालीन इतिहासातील तुंबळ युद्ध रुपेरी पडद्यावर सादर करण्याचं शिवधनुष्य उचललं... या प्रयत्नांना निर्माते अनिरबान सरकार आणि सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार यांची अचूक साथ लाभली... आणि ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ च्या प्रस्तुतीमुळे आकाराला आलाय भव्य-दिव्य ‘फर्जंद’. दिग्पालने या सिनेमात कोंडाजी फर्जंद या शिवरायांच्या वीर मावळ्याने पन्हाळ्यावर केलेल्या चढाईचं यथोचित चित्रण केलं आहे.

आज स्वराज्यातील बरेच किल्ले केवळ अवशेषांच्या अवस्थेत शिल्लक आहेत. या सिनेमात ते किल्ले व्हीएफएक्सच्या माध्यमातून दाखवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची भव्यता जाणवेल. रायगड किल्ल्याची बांधणी करतानाची दृश्ये या सिनेमात आहेत. ‘रायगड प्रशस्ती...’ हे रायगडाची कथा सांगणारं गाणं संस्कृत भाषेतील गाणं अंगावर रोमांच आणणारं आहे. ‘कोंडाजी फर्जंद’ साकारलेल्या अंकित मोहनची युद्धाची तयारी करताना होणारी लक्षवेधी एंट्री आहे. पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज, लक्ष्यभेदी नजर, योद्धयाला साजेसा कणखर अभिनय, दऱ्याखोऱ्यातील राहणीमान आणि एकूणच रांगडं व्यक्तिमत्त्व असलेल्या अंकितला पाहून जुन्या काळातील दिग्गज नटांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. शीर्षक भूमिकेतील अंकितच्या माध्यमातून उत्तम पर्सनॅलिटी आणि अभिनयाचा सुरेख मिलाफ पाहायला मिळेल. ‘वज्रबाहू...’ हे नायकाची ओळख करून देणारं संस्कृत गीत ओठांवर सहज रुळणारं आहे.

‘फर्जंद’ हा युद्धपट असल्याने यात ६० ते ७० टक्के अॅक्शन आहे. यासाठी जवळजवळ १००० कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. सिनेमाचं शूट सुरू असताना सेटवर दररोज सुमारे ४०० जणांचं युनिट कार्यरत असायचं. इतकं मोठं युनिट पाहून हा सिनेमा नक्की मराठीतच बनतोय की हिंदीत अशीही काहींना शंका यायची. ही साहस दृश्ये प्रशांत नाईक यांनी अतिशय कौशल्याने साकारली आहेत. या सिनेमामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अचूक वापर करण्यात आला आहे. मूनलाईट दाखवण्यासाठी दीड टन वजनाचा लाईट तयार केला आहे. क्रेनच्या सहाय्याने हा लाईट १५० फुटांवर लाईट टांगण्यात यायचा. कॅमेरामन केदार गायकवाडच्या संकल्पनेतील या मूनलाईटसोबतच छायांकनाची जादू सिनेमा पाहताना नक्कीच जाणवेल. हत्ती आणि घोड्यांचा यांचा भव्य वावर सिनेमात आहेच; ही सगळी भव्यता डोळ्यांची पारणं फेडणारी आहे. सिनेमा चा साऊंड निखिल लांजेकर यांनी केला असून डॉल्बी अॅटमॉस तंत्रज्ञानाचा अनुभव मिळणार आहे.

शिवकालीन वातावरण निर्मिती करण्यासाठी या सिनेमाचा बराचसा भाग निबीड अरण्यात शूट करण्यात आला आहे. उंच डोंगरकडे, घनदाट अरण्य आणि दुर्गम भागात शूट करताना ‘फर्जंद’च्या टिमचा खऱ्या अर्थाने कस लागला आहे. कॅास्च्युम हा देखील या सिनेमातील फार महत्त्वाचा घटक आहे. यात पोषाखांपासून दागिन्यांपर्यंत सारं काही शिवकालीन वाटावं असंच आहे. ‘फर्जंद’मधील विविध व्यक्तिरेखांसाठी वापरण्यात आलेल्या कॅास्च्युमने चार मोठे हॅाल भरले होते. युद्धाच्या दृश्यांसाठी जवळजवळ हजारभर शस्त्रे तयार करण्यात आली होती. त्याखेरीज कला दिग्दर्शक नितीन देसाईंकडे असलेल्या शस्त्रांचाही वापर करण्यात आला आहे. ‘फर्जंद’ची ही भव्य-दिव्यता पाहून आपसुकच ‘बाहुबली’ची आठवण होईल.

मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असून शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर, तर अंकित मोहन या कलाकाराने कोंडाजी फर्जंद साकारला आहे. या व्यतिरिक्त गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, प्रवीण तरडे, अस्ताद काळे, हरिश दुधाडे,नेहा जोशी, राहुल मेहेंदळे, निखील राऊत, राजन भिसे, अंशुमन विचारे, रोहन मंकणी, सचिन देशपांडे, समीर धर्माधिकारी प्रद्युमन सिंग या सर्व कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १ जूनला हा ‘फर्जंद’ प्रदर्शित होणार आहे.

Web Title: In view of 'Firzand', the audience will be reminded of Bahubali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.