मिमस्टर व्हायचंय? सुमित पाटील सांगतोय या क्षेत्रात कशी आहे स्पर्धा!
By शर्वरी जोशी | Published: September 5, 2021 04:55 PM2021-09-05T16:55:33+5:302021-09-05T16:56:17+5:30
Sumit Patil: आजही या क्षेत्राकडे म्हणावं तसं गांभीर्याने पाहिलं जातं नाही. बहुतेकवेळा मीम्स करणं हा कॉलेजच्या मुलांचा छंद आहे किंवा टाइमपास म्हणून मीम्स केले जातात असंच म्हटलं जातं.
कोणतीही घटना घडली की त्यावर मजेशीर अंदाजात चार ओळी टाइप केल्या की मीम्स तयार होतात असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे आजही या क्षेत्राकडे म्हणावं तसं गांभीर्याने पाहिलं जातं नाही. बहुतेकवेळा मीम्स करणं हा कॉलेजच्या मुलांचा छंद आहे किंवा टाइमपास म्हणून मीम्स केले जातात असंच म्हटलं जातं. परंतु, मीम्स करणं हीदेखील एक कला असून ती सर्वसामान्यांना पटकन जमणारी नाही. मीम्स तयार करणं म्हणजे केवळ विनोदशैलीत लिखाण करणं नव्हे. तर, परिस्थितीचं भान राखत कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या वा विशिष्ट घटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणूनच, या क्षेत्रात नेमकं कसं काम केलं जातं किंवा या क्षेत्रात कशा पद्धतीची स्पर्धा आहे हे मिमस्टर सुमित पाटीलने सांगितलं आहे.
"सध्याच्या काळात अशी अनेक कॉलेजला जाणारी मुलं आहेत जे केवळ छंद किंवा टाइमपास म्हणून मीम्स तयार करतात. यात काही जण हौस म्हणून नोकरी-व्यवसाय सांभाळून मीम्स तयार करतात. परंतु अजूनही या क्षेत्राकडे कोणीही गांभीर्याने किंवा करिअरचं माध्यम म्हणून पाहिलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी या क्षेत्रात फारशी स्पर्धा नाही," सुमित म्हणाला.
Radio City ते मिमस्टर! सुमित पाटीलचा भन्नाट प्रवास
पुढे तो म्हणतो, "ज्याप्रमाणे या क्षेत्रात स्पर्धा नाही त्याचप्रमाणे येथे इन्कमदेखील फारसं मिळत नाही. त्यामुळे इथे स्ट्रगल करणं मस्ट आहे. सध्या पाहायला गेलं तर अनेकांना मीम्समागील खरा अर्थ उलगडू लागला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या प्रमोशनसाठी मीम्सचा आधार घेताना दिसतात. म्हणूनच, या क्षेत्रात संधी आहेत. पण, त्यासाठी क्रिएटिव्ह असणंही तितकंच गरजेचं आहे."