एकेकाळी सनासाठी बाबागाडी घ्यायलाही नव्हते पैसे; लेक मोठी होताच केदार शिंदेंनी गिफ्ट केली चारचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 03:13 PM2023-08-07T15:13:18+5:302023-08-07T15:55:41+5:30
Kedar shinde: केदार शिंदे यांनी करिअर, यश यांच्याविषयी बोलत असतानाच जुन्या आठवणींनाही उजाळा दिला
मराठी कलाविश्वातील अभ्यासू दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. प्रेक्षकांना जुन्या आठवणींमध्ये रमायला लावणाऱ्या मालिका, सिनेमांची निर्मिती करुन केदार शिंदे कायमच चर्चेत येत असतात. अलिकडेच त्यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सध्या या सिनेमाची संपूर्ण टीम चर्चेत येत आहे. आज केदार शिंदे यश, संपत्ती, प्रसिद्धी सारं काही उपभोगत आहेत. परंतु, एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे लेकीसाठी साधी एक बाबागाडी घ्यायलाही पैसे नव्हते. एका मुलाखतीमध्ये त्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
केदार शिंदे यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी करिअर, यश यांच्याविषयी बोलत असतानाच जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.एक वेळ अशी होती जेव्हा भाड्याच्या घरात रहावं लागत होतं. सनाच्या इच्छाही नीट पूर्ण करता येत नव्हत्या. परंतु, अथक मेहनत आणि परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. असं त्यांनी बोलताना सांगितलं.
'बाईपण..'च्या खऱ्या 'सुपर-सिस्टर्स' ! 'या' सहा जणींवरून सुचली सिनेमाची कथा
"लग्नानंतर मी गोरेगावला राहयचो. त्या जागेचं भाडं होतं ६ हजार रुपये. तेवढे पैसे जमवणं सुद्धा माझ्यासाठी जिकरीचं होतं.सना दीड वर्षांची होती तेव्हा मला तिच्यासाठी बाबागाडी घ्यायची होती. त्याची किंमत त्यावेळी साडेतीन हजार रुपये होती. पण, माझ्या खिशात सातशे-आठशे रुपये होते. मात्र, जेव्हा सना १८ वर्षांची झाली त्यावेळी मी आणि बेलाने तिला चारचाकी गिफ्ट केली", असं ते म्हणाले.
'कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेल्या पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार?'; अशोक सराफ यांचा प्रश्न
पुढे ते म्हणाले, "आर्थिकदृष्ट्या आपण कधीच स्थिर होऊ शकत नाही आणि तसं होण्यासाठी एक ब्लॉकबस्टर शुक्रवार तुमच्या आयुष्यात यावा लागतो. त्याचीच वाट पाहतोय मी." दरम्यान, नुकताच त्यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात सुचित्रा बांदेकर, रोहिणी हट्टंगडी, दिपा परब-चौधरी, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, सुकन्या मोने या अभिनेत्री झळकल्या आहेत.