असं काय घडलं की लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ऋण 'ती' कधीच विसरणार नाही, वाचा हा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:20 PM2023-06-19T12:20:24+5:302023-06-19T12:21:02+5:30
Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जुन्या मुलाखतीची एक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या अचूक कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते, तर काही काही चित्रपटातून प्रेक्षकांना रडवलेदेखील. या गुणी अभिनेत्याचे १६ डिसेंबर, २००४ मध्ये निधन झाले. त्यांना या जगाचा निरोप घेऊन जवळपास १९ वर्षे झाली आहेत. पण कलाकृतींच्या माध्यमातून ते आजही आपल्यात आहेत. त्यांच्या चित्रपटाशिवाय त्यांच्या मुलाखतीही ऐकायला मिळतात. त्यावेळची अशीच एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. या मुलाखतीत एक भाग सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या एका चाहत्यासोबत आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना दिसत आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जुन्या मुलाखतीची एक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात अभिनेत्याने एक किस्सा सांगितला आहे. यात ते सांगत आहेत की, मी एक प्रयोग केला, साधारण १२-१२.३० च्या सुमारास तो प्रयोग संपला. त्यानंतर मी विंगेत होतो आणि एक माणूस आत आला. मला तो म्हणाला की लक्ष्मीकांतजी माझ्या बायकोला तुम्हाला भेटायचे आहे. मी म्हणालो तुम्ही त्यांना आत घेऊन या. कारण मी खूपच खकलोय. त्यावर तो माणूस म्हणाला की ती येऊ शकत नाही तेव्हा मी म्हटलं का? त्यावर तो म्हणाला की ती व्हिलचेअरवर आहे. मी म्हटले अरे बापरे. तेव्हा मी धावत बाहेर गेलो. त्यांना पाहिले. त्यांना भेटलो. त्या व्हिलचेअरवरील बाईंनी 'कारटं' २० ते २५ वेळा पाहिले होते.
लक्ष्मीकांत बेर्डे पुढे म्हणाले की, त्या माणसाने मला सांगितले की लग्नाच्या आधी ही चांगल्या अवस्थेत होती. परंतु लग्नानंतर तिचा अपघात झाला आणि तिचे पाय गेले. ती जवळपास वर्षभर कुणाशीच बोलली नाही. जेव्हा माझा टीव्हीला 'पाणी टंचाई' हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून त्या हसायला लागल्या. मग त्या माझे टीव्हीवरचे कार्यक्रम बघायला लागल्या. त्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्या आता आमच्याशी बोलतात. तो माणूस मला म्हणाला की हे सगळे तेही तुमच्यामुळे. मी म्हणालो, माझ्यामुळे नाही माझ्या विनोदामुळे त्या बऱ्या झाल्या. यात माझं काहीच नाही.