"हातात बिअर घेऊन प्रोफेसर माझ्या घरी आले आणि...", हेमंत ढोमेने सांगितला मजेशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:34 IST2025-01-01T10:34:24+5:302025-01-01T10:34:46+5:30
हेमंत ढोमेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक मजेशीर किस्सा शेअर केला.

"हातात बिअर घेऊन प्रोफेसर माझ्या घरी आले आणि...", हेमंत ढोमेने सांगितला मजेशीर किस्सा
हेमंत ढोमे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'क्षणभर विश्रांती', 'ऑनलाईन बिनलाईन', 'चोरीचा मामला', 'फकाट', 'पोश्टर गर्ल', 'बघतोस काय मुजरा कर' अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. अभिनेता असण्याबरोबरच हेमंत तो एक दिग्दर्शकही आहे. 'झिम्मा', 'सनी' अशा सिनेमांचं त्याने दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच हेमंतने दिलेल्या एका मुलाखतीत एक मजेशीर किस्सा शेअर केला.
हेमंतने आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने एक मजेशीर किस्सा शेअर केला. तो म्हणाला, "माझे रिचार्ड नावाचे एक प्रोफेसर होते. ते जेव्हा पहिल्यांदा माझ्या घरी आले तेव्हा हातात दोन बिअर घेऊन आले होते. आम्ही प्रोजेक्टवर चर्चा करणार होतो. त्यामुळे मला कळतंच नव्हतं की मी आता काय करू? आपलं upbringing पण असं आहे की ते आल्यावर मी माझ्या इंग्रजीत त्यांचं वेलकम केलं. ते आले आणि त्यांनी बिअरच्या बाटल्या उघडल्या. आणि मला म्हणाले की घे. मी त्यांना म्हटलं की मी अशा पद्धतीने दारू पित नाही. तर ते म्हणाले की नाही नाही तुला प्यावी लागेल. मग आम्ही बिअर पीत पीत "तू या कोर्सला काय करणारेस" याच्याबद्दल बोललो. मला असं झालेलं की हे काय आहे? हे काहीतरी विचित्र आहे".
"म्हणजे शिक्षक अशा पद्धतीने भेटतील किंवा बोलतील असं कधी वाटलंच नव्हतं. Alison Rosen नावाची एक HOD होती. ती सुद्धा अशीच होती. ती घरी यायची आणि विचारायची आज काय बनवणार आहेस. म्हणजे ही माणसं माणूस म्हणून तुम्हाला किंमत देतात. तुमच्याकडे ते विद्यार्थी किंवा शिक्षक म्हणून बघत नाहीत. माणूस म्हणून तुमच्याशी ते डील करतात", असंही पुढे त्याने सांगितलं.