'पैसे नसताना अशोकनं मला चेक दिला अन्...', नाना पाटेकर 'तो' किस्सा सांगताना झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 07:00 AM2022-10-18T07:00:00+5:302022-10-18T07:00:00+5:30
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी अशोक मामांसोबतचा आणि त्यांच्या मैत्रीचा भावनिक किस्सा सांगितला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मैत्रीचं नातं सगळ्या नात्यापेक्षा सुंदर म्हटलं जातं. आपल्या मित्रासाठी जीवाची बाजी लावणारे मित्र मिळायला देखील भाग्य लागत. असं भाग्य नाना पाटेकरांना (Nana Patekar) लाभलं आणि ऐन अडचणीच्या वेळी अशोक सराफ त्यांच्यासाठी वेळोवेळी धावून आले. विनोदाचा बादशहा असणारे अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीवरही राज्य करणारे अभिनेते नाना पाटेकर एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. नुकताच नानांनी अशोक मामांसोबतचा आणि त्यांच्या मैत्रीचा भावनिक किस्सा सांगितला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नाना एक किस्सा सांगताना म्हणाले होते, 'हमीदाबाईची कोठी नाटक करताना मला ५० रुपये मिळायचे आणि अशोकला २५० रुपये मिळायचे. त्या पडत्या काळात अशोकने मला पैशांची खूप मदत केली. नाटकाच्या मधल्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो. त्यावेळी मला पैसे मिळावे म्हणून तो मुद्दामून हरायचा. हे माझ्याही लक्षात यायचं पण तेव्हा मला पैशांची गरज होती. अगदी नाटकानंतर बऱ्याचदा मी अशोकचं डोकं चेपून द्यायचो, पाय चेपायचो आणि त्याचेही तो मला पैसे द्यायचा.'
गणपतीची आठवण सांगताना नाना म्हणाले, 'एकदा गणपतीला माझ्याकडे पैसे नव्हते. फुलांचा सगळा खर्च कसा करायचा हा प्रश्न होता. सकाळी सहा साडे सहा वाजता अशोक फिल्मसिटीला शूटिंगला निघाले होते. माहीमच्या घरी आले, दारावर टकटक केलं, माझ्या हातात एक कोरा चेक दिला आणि म्हणाला.. खात्यात १५ हजार आहेत…तुला हवे तेवढे काढ. असं म्हणून ते निघून गेले. मी तीन हजार रुपये काढले होते. काही वर्षानंतर आम्ही एका सिनेमात एकत्र काम करत होतो. त्यावेळी मी ते परत दिले.'
नाना आणि मामा म्हणजेच नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्यातील मैत्री ही शब्दात सामावणारी नाही. कारण रंगभूमीवर पाऊल ठेवल्यापासून एकमेकांच्या पडत्या काळात सोबतपर्यंत ते अगदी सुपरस्टार होईपर्यंत ते कायमच एकमेकांच्या सोबत राहिले आहेत. त्यांनी एकमेकांसोबत चित्रपटात जरी कमी काम केलं असलं तरी 'हमिदाबाईची कोठी' या नाटकामुळे त्यांच्यातील मैत्री घट्ट झाली. अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांनी एकमेकांना दिलेली साथ ते अजूनही विसरलेले नाहीत. त्यांच्यातील मैत्री आजही अशीच घट्ट आहे.