"या एकत्र आल्या की पाऊस पडतोच...", 'बाईपण भारी देवा'च्या टीमचं रियुनियन, केदार शिंदेंची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 11:29 AM2024-07-09T11:29:24+5:302024-07-09T11:30:16+5:30
Baipan Bhari Deva Movie : ३० जून २०२३ रोजी बाईपण भारी देवा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
३० जून २०२३ रोजी बाईपण भारी देवा (Baipan Bhari Deva Movie) चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. खास करून महिलांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडत करत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ‘सैराट’नंतरचा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. दरम्यान आता या चित्रपटाच्या टीमचं रियुनियन अलिकडेच दिग्दर्शक केदार शिंदें(Kedar Shinde)च्या घरी पार पडलं. त्याचे फोटो शेअर करत केदार शिंदेंनी पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे यांनी बाईपण भारी देवा चित्रपटाच्या रियुनियनचा फोटो शेअर करत लिहिले की, या एकत्र आल्या की, पाऊस पडतोच. मग तो पैशांचा असो वा खराखुरा!! बाईपण भारी देवा हा माझ्या आयुष्यातील सुखद धक्का. एक वर्ष सरलं तरी, त्याचं प्रमोशन सेलिब्रेशन संपतच नाही. कारण या अभिनेत्री आहेतच तशा टेरिफिक. काल रात्री घरी जमलो. बाहेर मुसळधार पाऊस पडत असतानाच, घरात मैफिल रंगली होती. खुप मज्जा.. मी आणि बेला या सगळ्यांचे ऋणी आहोत. आपण वेगवेगळ्या कामांत असतो, एक संध्याकाळ अशा संगतीत गेली की, पुन्हा कामाला हुरूप येतो. वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब-चौधरी, ओमकार मंगेश यांना या पोस्टमध्ये टॅग केले आहे.
केदार शिंदेंच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. यावर सुकन्या मोनेंनी कमेंटमध्ये लिहिले की, मीच तुझी आणि बेलाची ऋणी आहे .... एक अविस्मणीय भूमिका माझ्या नावावर शिक्कमोर्तब झाली ती केवळ तुझ्यामुळे.... गेले वर्षभर वेगवेगळ्या चित्रपटांचे प्रमोशन मी करतेय पण ' बाईपण'चे कौतुक अजूनही थांबत नाहीये... रसिक प्रेक्षक विसरू शकत नाहीयेत... जिओचे ही मनःपूर्वक आभार! कालची पार्टी,जेवण अप्रतिम.... जिव्हाळ्याचा सोहळा.