कलावंतांच्या पेन्शनचे घोडे अडले कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:41 PM2022-08-10T12:41:44+5:302022-08-10T12:42:15+5:30

जूनपर्यंतची पेन्शन कलाकारांना मिळाली आहे. जुलै महिना संपला तरी या महिन्याची पेन्शन देणे अद्याप बाकी आहे.

when will artists state get pension | कलावंतांच्या पेन्शनचे घोडे अडले कुठे?

कलावंतांच्या पेन्शनचे घोडे अडले कुठे?

googlenewsNext

संजय घावरे

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात कलाकारांना त्यांची पेन्शन बंद झाली की सुरू आहे या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. अल्प असूनही कोरोनाच्या काळात पेन्शनने काही कलाकारांना मदतीचा हात दिला होता. अद्यापही महाराष्ट्रातील बरेच कलाकार पेन्शपासून वंचित आहेत. पेन्शन योजनेसाठी असलेल्या अटींची पूर्तता करण्यात अपयशी ठरणाऱ्या कलाकारांना पेन्शन मिळू शकलेली नाही, पण पेन्शन बंद झालेली नसून, केवळ जुलै महिन्याची पेन्शन द्यायची बाकी असल्याचे उघड झाले आहे.

जूनपर्यंतची पेन्शन कलाकारांना मिळाली आहे. जुलै महिना संपला तरी या महिन्याची पेन्शन देणे अद्याप बाकी आहे. पेन्शनसाठी पात्र ठरणाऱ्या कलाकारांची अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. अ वर्गातील कलाकारांना ३१५० रुपये, ब वर्गातील कलाकारांना २७०० रुपये आणि क श्रेणीतील कलाकारांना २२५० रुपये पेन्शन देण्यात येते. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे जितके वैध अर्ज आले आहेत त्या सर्वांना पेन्शन सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून मिळालेली आहे.

२९६०० च्या आसपास एकूण पेन्शनधारकारक आहेत. ७ कोटी रुपयांच्या आसपास दरमहा पेन्शन वाटप होते. कलाकारांची निवड जिल्हा पातळीवर केली जाते. कोरोनाकाळातही पेन्शन व्यवस्थित सुरू होती. निधी यायला उशीर व्हायचा तेव्हा विलंब व्हायचा. आता केवळ जुलै २०२२ची पेन्शन शिल्लक आहे. थेट पेन्शनधारकांच्या खात्यात रक्कम जमा होते. पेन्शनसाठी कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत.

"दरवर्षी जिल्हा निवड समितीच्यामार्फत पेन्शनधारक कलाकारांची निवड केली जाते. निवड झाल्यावर यादी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे येते. त्यानुसार आम्ही पेन्शनधारकांच्या यादीत कलाकारांच्या नावांचा समावेश करून घेतो. पेन्शन योजनेसाठी पात्र असलेल्या जास्तीत जास्त कलाकारांनी या योजनेसाठी अर्ज करून नोंदणी करायला हवी. नाटक, लोककला, साहित्य, भजन-किर्तन अशा प्रायोगिक कला सादर करणाऱ्या कलाकांना पेन्शन योजना लागू होते." - बिभिषण चवरे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय)


"पेन्शन योजनाच नव्हे तर प्रत्येक सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. कलाकार म्हणून सरकारी कागदपत्रांच्या आधारे आपली ओळख जपून ठेवणे आवश्यक आहे. यासाठी कलाकारांची नोंदणी व्हायला हवी आमची मागणी होती. नोंदणी केल्यावर सरकारच्या वतीने एक ओळखपत्र देण्यात यावे असेही आमचे म्हणणे होते, पण कुणीच काही हालचाल केली नाही."- विजय राणे (सभासद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ)


पेन्शनसाठी रंगकर्मी आंदोलन...

९ ऑगस्ट २०२१ रोजी विजय पाटकर आणि कलाकारांनी संपूर्ण महाराष्ट्रभर रंगकर्मी आंदोलन केले होते. त्यात कलाकारांच्या हिताच्या बऱ्याच मागण्या सरकारकडे करण्यात आल्या होत्या. कलाकारांसाठी जाचक ठरणाऱ्या काही अटी शिथिल करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती. काही गोष्टी सांस्कृतिक मंत्र्यांनी मान्यही केल्या होत्या, पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. उत्पन्नाच्या दाखल्याच्या अटीमुळे आजही बरेच कलाकार पेन्शनपासून वंचित आहेत.

प्रशस्तीपत्रके जपून ठेवा...

नाटक आणि लोककलेशी निगडीत असलेले कलाकार बऱ्याचदा सरकारी उपक्रमांसाठी काही ना काही कामे करत असतात, पण चित्रपटसृष्टीतील कलाकारांना सरकारी कार्यक्रमांशी संबंधित असलेली फारशी कामे करण्याची संधी मिळत नाही. जे सरकारी उपक्रमांसाठी कामे करतात त्या कलाकारांनी कामाचे प्रशस्तीपत्रक घेणे गरजेचे आहे. अशा प्रशस्तीपत्रकांचा संग्रह करून ठेवला तर पुढे पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. कलाकारांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही.
 

Web Title: when will artists state get pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.