रितेशला कोणी दिला हा सल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 03:01 PM2016-12-16T15:01:06+5:302016-12-16T15:01:06+5:30
बॉलिवूड क्षेत्रात दीर्घकाळ स्थिरावलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींना एका कार्यक्रमात उजाळा दिला. महराष्ट्राचे ...
ब लिवूड क्षेत्रात दीर्घकाळ स्थिरावलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींना एका कार्यक्रमात उजाळा दिला. महराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा सुपुत्र असल्याचे माझे भाग्य असल्याचे रितेशने एका शोमध्ये सांगितले. रितेशने वडील विलासराव देशमुख यांच्याबद्दल दाटून आलेल्या भावनेला वाट करून दिली. मी लहानपणापासून राजकारण पाहत आलो आहे, बाबा सतत कोणत्या ना कोणत्या सभेसाठी व्यस्त असायचे, घरी सतत राजकारणी लोकांची वर्दळ असायची. त्यामुळे मी भविष्यात अभिनय क्षेत्रात काम करेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. खरे सांगायचे तर मी, आर्किटेक्ट आहे. मात्र एकदा रामोजी टेलिफिल्म्सकडून मला तुझे मेरी कसम साठी विचारण्यात आले. त्यांची ही आॅफर स्वीकारायची की नाही याचा विचार करायला मी १० दिवस त्यांच्याकडून मागितले. बाबा (विलासराव देशमुख) त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा जपणे देखील मला महत्वाचे वाटले. मी सिनेमात काम करू का असे बाबांना विचारायचे माझे धाडस होत नव्हते. तसेच कामात अतिव्यस्त असल्याने त्यांची भेट घेण देखील मला या दिवसात अशक्य होतं. मात्र अखेरीस मी बाबांना फिल्मविषयी सांगितले, काम करू का असे विचारले. त्यावेळी बाबांनी हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे असे सांगत मला प्रोत्साहन दिल्याचे रितेश सांगतो. दरम्यान हा सिनेमा करताना प्रेक्षक मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून मला ओळखतील, याची जाणीव रितेशला होती, त्यामुळे सिनेमा चालला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाला अभिनय येत नाही अशी टीका होण्याची शक्यता होती. रितेशने ही भीती देखील विलासराव देशमुख यांना बोलून दाखवली. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी माझा मुलगा नव्हे तर स्वत:ची एक विशेष ओळख बनवण्याचा सल्ला रितेशला दिला. काही होणार नाही, तू तुझे नाव जप, मी माझे नाव जपतो हे वडिलांचे वाक्य आजही मला आठवते असे रितेशने सांगितले.