Marathi Movie : मराठीचे वऱ्हाड लंडन मुक्कामी! १८ पेक्षा अधिक सिनेमांना लंडनचे वेध

By संजय घावरे | Published: February 26, 2023 02:56 PM2023-02-26T14:56:43+5:302023-02-26T18:45:31+5:30

Marathi Movie : लंडनमधील चित्रीकरण मराठीच्या फायद्याचे ठरत असून, याचा बॉक्स ऑफिसवरही बऱ्यापैकी परिणाम दिसत आहे.

Why are most of the marathi movies shot in london | Marathi Movie : मराठीचे वऱ्हाड लंडन मुक्कामी! १८ पेक्षा अधिक सिनेमांना लंडनचे वेध

Marathi Movie : मराठीचे वऱ्हाड लंडन मुक्कामी! १८ पेक्षा अधिक सिनेमांना लंडनचे वेध

googlenewsNext

कोरोनापूर्व काळापासून लंडन हे मराठी चित्रपटांचे जणू माहेरघर बनले आहे. सध्या १८ पेक्षा अधिक चित्रपटांपैकी काहींचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरू असून, तर काही पाईपलाईनमध्ये आहेत. लंडनमधील चित्रीकरण मराठीच्या फायद्याचे ठरत असून, याचा बॉक्स ऑफिसवरही बऱ्यापैकी परिणाम दिसत आहे.

२०१५-१६ नंतर मराठी सिनेमे लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात शूट होऊ लागले. 'मन फकीरा' तसेच 'ये रे ये रे पैसा २'पासून लंडनमध्ये शूटिंग करण्याचा ट्रेंड सुरु झाला. लंडन सरकारकडून चित्रपटांना मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा कशा प्रकारे मराठीला करून घेता येऊ शकतो याची जाणीव निर्मात्यांना झाली. लंडनमध्ये शूट झालेल्या 'झिम्मा' चित्रपटाने कोरोना नंतरच्या काळात मराठीला तिकिटबारीवर नवसंजीवनी मिळवून दिली. त्यानंतर 'दे धक्का २'सारखे बरेच चित्रपट लंडनमध्ये शूट झाले. युके हा एकमेव देश आहे जो तिथे खर्च केल्याबद्दल सबसिडी देतोच, पण भारतातील खर्चाचाही तिथे अनुदानाद्वारे फायदा घेता येतो. ८०% सिनेमा तिथे शूट केल्यावर तिथल्या शूटिंगच्या खर्चापैकी २५% रक्कम मिळतेच, पण इतर कास्ट अँड क्रूजच्या फीबद्दलही तिथे क्लेम करता येतो. त्यामुळे चांगली रक्कम हाती येते. यासाठी एजंट्स आणि ऑडिट कंपन्यांचीही मदत घेता येऊ शकते. याच कारणामुळे लंडनमध्ये मराठी चित्रपटांच्या शूटिंगचे प्रमाण वाढले आहे.
१८ सिनेमांचे लंडनमध्ये देशात शूटिंग होणे मराठी सिनेसृष्टीच्या वैभवाचे लक्षण असून, अतिशय उत्तम वाटचाल सुरू आहे. आज आपण ग्लोबल युगात असल्याचे मराठी सिनेमा अधोरेखित करत आहे. अशा सकारात्मक वातावरणात उगाच शोज मिळत नाहीत हे रडगाणे गाऊ नये असे ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी यांचे म्हणणे आहे.
 
लंडनच्या वाटेवर...
सुभाष घईंच्या मुक्ता आर्टस व एव्हीके एन्टरटेन्मेंटचा 'माय डॅड्स वेडींग', शंतनू रोडेचा 'कैरी', संजय जाधवचा 'कलावती', गजेंद्र आहिरेंचा 'श्रीमती अंब्रेला', प्रकाश कुंटेचा 'सोलमेटस' राजन वाघधरेंचा 'कधी प्रेम कधी लोच्या', विशाल देवरुखकरचा 'बॅाईज ४', 'झिम्मा २', 'पोस्टर बॅाईज २', 'डेट भेट', 'रिटर्न जर्नी', 'काँग्रेच्युलेशन्स',  यांसोबत दिग्दर्शक  संतोष मांजरेकर, आदित्य इंगळे आणि समीर जोशी प्रत्येकी एकेक चित्रपट करत आहेत. मिलिंद बोकीलांच्या कादंबरीवरील सिनेमाही लंडनमध्ये बनणार आहे. आणखी काहींचे प्लॅनिंग सुरू आहे.
 
लंडनमध्ये अनुदानासाठी...
४०% स्थानिक कास्ट-क्रू घ्यावा लागतो.
६०% भारतीय कलाकार-तंत्रज्ञ असावेत.
७५% शूट तिथे करणे आवश्यक असते.
३० पैकी २३ पॅाईंट्स मिळवावे लागतात.
१०% शूट महाराष्ट्रात केल्यास इथलीही सबसिडी मिळते.

.........................

लंडन सरकारचा कारभार खूप पारदर्शक आहे. अनुदानासाठी फार प्रतीक्षा करावी लागत नाही. वेळच्या वेळी आवश्यक गोष्टींची पूर्तता केल्यास प्रत्येक गोष्ट मंजूर होते आणि अत्यंत कमी वेळात अनुदान मिळते. 'मन फकीरा'साठी खर्च केलेले पैसे आठ महिन्यात अनुदानरूपात परत मिळाले.

-- नितीन वैद्य (निर्माता)
.........................

लंडन दाखवायचे म्हणून तिथे शूट होत नसून कथानकाची गरज आणि तिथली सब्सिडी हे प्रमुख मुद्दे आहेत. आम्ही फक्त लंडन दाखवत नसून, तिथे कथा सांगतो. कित्येक मराठी सिनेमासाठी थिएटरममध्ये तितकासा प्रेक्षक येत नसल्याने निर्मात्याचे नुकसान होऊ नये म्हणून हा पर्याय शोधला आहे. तिथे शूट करताना केवळ प्रवासखर्च वाढतो.

- निनाद बत्तीन (पार्टनर, एव्हीके एन्टरटेन्मेंट)

 पॅाईंट्ससाठी निकष...
स्क्रीप्टमध्ये लंडनबद्दल आक्षेपार्ह नसल्याचे पाहिले जाते. त्यांच्या भाषेचा किती प्रसार केला जातो, तिथली कॅरेक्टर्स किती आहेत, तिथल्या तंत्रज्ञानांना किती वाव दिला जातो, किती दिवस शूट, कोणकोणती लोकेशन्स अशा विविध गोष्टींवर पॅाईंट्स अवलंबून असतात. लहान मुलांच्याबाबतीतील गुन्हेगारीचा समावेश स्क्रीप्टमध्ये असल्यास परवानगी मिळत नाही.
 
कॅास्ट बॅलन्सिंग...
लंडनमध्ये शूट करणे तसे महाग आहे, पण कॅमेरा-साऊंड वगैरे इथून नेले, लाईट्स तसेच स्पेशल इक्वीपमेंटस तिथल्या वापरल्या आणि तिथले नेमकेच कलाकार घेतल्यास बऱ्यापैकी कॅास्ट बॅलन्स करत सुवर्णमध्य साधता येऊ शकतो. तिथल्या काही गोष्टींचा समावेश करून घेणे अनुदानासाठी पॅाइंट्स मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

Web Title: Why are most of the marathi movies shot in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.