'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? प्रसाद ओक म्हणाला, "एकनाथ शिंदेंनी मला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:19 PM2023-11-28T17:19:51+5:302023-11-28T17:21:41+5:30
'धर्मवीर २'च्या मुहुर्त सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओकने केलेल्या विधानानंतर 'धर्मवीर ३' बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
'धर्मवीर' या बहुचर्चित सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'धर्मवीर २'चा मुहुर्त सोहळा पार पडला. शिवसैनिक आनंद दिघेंचा जीवनप्रवास धर्मवीर सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर 'धर्मवीर २'ची घोषणा करण्यात आली होती. 'धर्मवीर २'च्या मुहुर्त सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओकने केलेल्या विधानानंतर 'धर्मवीर ३' बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
धर्मवीरमध्ये प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. आता 'धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सिनेमातही प्रसाद दिघेंच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, "आज आपण धर्मवीर २च्या मुहुर्ताच्या निमित्ताने भेटलो आहोत. हा कार्यक्रम सुरू होतानाच साहेबांनी मला कानात विचारलं की आता तिसरा भाग पण येणार का? मला वाटतं ही दुसऱ्या भागाची सुरुवात म्हणजेच तिसऱ्या भागाची नांदी आहे."
"प्रवीणसारखा अत्यंत सजग लेखक-दिग्दर्शक, मंगेशसारखा दमदार अभिनेता-निर्माता जोपर्यंत या चित्रपटाशी जोडलेला आहे...पाठीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समोर आपल्याला दिसत नसले तरी आशीर्वाद देणारे दिघे साहेबांचे हात आहेत... तोपर्यंत या चित्रपटाचे भाग होतंच राहतील, अशी आशा व्यक्त करतो," असंही पुढे प्रसाद म्हणाला.
'धर्मवीर २'च्या मुहुर्त सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी "दिघे साहेबांच्या काळात मी नगरविकास मंत्री होतो. आता दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री असेन", असं विधान केलं. त्यामुळे 'धर्मवीर २'मध्ये नक्की काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 'धर्मवीर २' मध्ये अभिनेता क्षितीश दाते एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार आहे. तर प्रवीण तरडे या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन करणार आहेत. २०२४मध्ये हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.