महिला दिन विशेष; मराठीने धरला स्त्रीप्रधान चित्रपटांचा फेर
By संजय घावरे | Published: March 7, 2024 08:10 PM2024-03-07T20:10:31+5:302024-03-07T20:10:44+5:30
'झिम्मा', 'बाईपण भारी देवा'नंतर 'नाच गं घुमा' आणि 'गुलाबी'ची चर्चा
मुंबई - 'झिम्मा' आणि 'बाईपण भारी देवा' या चित्रपटांना रसिकांनी गर्दी केल्यानंतर भविष्यात आणखी काही मल्टिस्टारर महिलाप्रधान मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीने चित्रपट निर्मितीकडे वळताना महिलाप्रधान कथानकाला प्राधान्य दिले आहे. अश्विनी भावेही सात वर्षांनी स्त्रीप्रधान चित्रपटाद्वारे अभिनयात पुनरागमन करत आहे.
कोरोनामुळे मराठी सिनेसृष्टीला आलेली मरगळ झटकण्याचे काम नोव्हेबर २०२१मध्ये आलेल्या 'झिम्मा' चित्रपटाने केले. यात सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सायली संजीव, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले यांच्या साथीने सिद्धार्थ चांदेकरने धरलेला फेर संपूर्ण महाराष्ट्राला भावला. कोरोनानंतर लादलेल्या निर्बंधांच्या वातावरणातही कोट्यवधींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा सिक्वेल 'झिम्मा २' मागच्या वर्षी रिलीज झाला. २००४मध्ये स्त्रियांच्या मनातील ओळखणाऱ्या नायकाची कथा सांगणाऱ्या 'अगं बाई अरेच्चा!' चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या केदार शिंदेने मागच्या वर्षी पुन्हा स्त्रीप्रधान चित्रपट बनवत महाराष्ट्रातील तमाम रसिकांना वेड लावले. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुरुची आडारकर यांची अशी काही भट्टी जमली की या चित्रपटाने जवळपास ९० कोटींचा गल्ला जमवला.
अभिनेता स्वप्नील जोशीने, शर्मिष्ठा राऊत आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णीच्या साथीने चित्रपट निर्मितीत पाऊल ठेवताना पदार्पणातच मल्टीस्टारर महिलाप्रधान कथानक निवडले आहे. 'नाच गं घुमा' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात स्वप्नीलसोबत मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी सांभाळली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 'गुलाबी' या आणखी एका मल्टिस्टारर स्त्रीप्रधान चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेली अश्विनी भावे या चित्रपटाद्वारे सात वर्षांनी पुनरागमन करणार आहे. तीन मैत्रीणींची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात अश्विनीसोबत मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे मुख्य भूमिकेत आहेत. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शनासोबतच सुहास जोशी, शैलेश दातार आणि निखिल आर्या यांच्यासोबत अभिनयही करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे.
रिलमध्ये दिसणार रिअल 'मायलेक'
'माय लेक' हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात वास्तवातील मायलेक असलेली सोनाली खरे आणि सनाया आनंद शीर्षक भूमिकेत दिसणार आहेत. प्रियांका तन्वर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.