'14 वर्ष इंडस्ट्रीत काम केलं, पण..'; फॉलोअर्स कमी असल्यामुळे मराठी अभिनेत्रीला दाखवला बाहेरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:00 PM2024-03-14T17:00:59+5:302024-03-14T17:01:17+5:30
Rupali gaykhe: या अभिनेत्रीने बाळू मामाच्या नावाने चांगभलं या मालिकेतही काम केलं आहे.
कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयशैलीच्या जोरावर इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, मराठी कलाविश्वात सध्या एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने जवळपास १२-१३ वर्ष इंडस्ट्रीत काम केलं. मात्र, अलिकडेच तिला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत, तिला ऑडिशनला आलेला विचित्र अनुभव शेअर केला आहे. या अभिनेत्रीचे फॉलोअर्स कमी असल्यामुळे तिला चक्क बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
सोशल मीडियावर सध्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने जवळपास १२-१३ वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. मात्र, सोशल मीडियावर फारसा फॉलोअर्स नसल्यामुळे तिला चक्क एका प्रोजेक्टमधून रिजेक्ट केलं आहे. याविषयी तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत खंत व्यक्त केली आहे.
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं 'या मालिकेतील अभिनेत्री रुपाली गायखे हिच्यासोबत हा धक्कादायक प्रसंग घडला असून तिने व्हिडीओ शेअर करत घडलेला प्रसंग सांगितला आहे.
नेमकं काय घडलं रुपालीसोबत?
मी नुकतीच एका ऑडिशनला गेले होते. तिथे सोशल मीडियावर तुझे किती फॅन्स आहेत? असा प्रश्न विचारला. त्यावर २ हजारच्या आसपास असतील असं मी सांगितलं. परंतु, या फॉलोअर्सच्या आधारावर त्यांनी मला रिजेक्ट केलं. सोबतच घडलेला प्रकार योग्य आहे का? असा प्रश्नही तिने विचारला.
काय म्हणाली रुपाली?
तुम्हाला तर माहितच आहे की मी एक अभिनेत्री आहे. मी गेली १३ ते १४ वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे. मी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसते. माझं काम अभिनेत्री म्हणून तुम्हाला टिव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मी आज एका मिटींगला गेले, तिथे मला इंस्टावरचे फॉलोअर्स किती आहेत ते विचारले. मी इंस्टावर जास्त व्हिडीओ शेअर करत नाही आणि स्टोरीज पण टाकत नाही. फॉलोअर्स वाढवण्यासाठी मी कधी काही जास्त कामच केलं नाही. मी त्यांना दोन हजारापर्यंत फॉलोअर्स असल्याचं सांगितलं. पण मला आज असं वाटायला लागलं की मी जे १३-१४ वर्षे या इंडस्ट्रीत काम केलंय, ८ वर्षे थिएटर केलंय मी आजपर्यंत जेवढ काही काम केलंय ते काम करून मला मोठं व्हायचं होतं. पण इथे इंस्टावरील फॉलोअर्स पाहून मी पुढे काम करू शकते की नाही हे ठरवलं जातंय. मग मी घरी राहूनच व्हिडीओ शूट केले असते, असं रुपाली म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मला कुणालाही वाईट किंवा दोषी ठरवायचं नाही. जे लोक घरी राहून व्हिडीओ बनवून फेमस होतात तेही त्यामागे मेहनत घेत असतात. पण मी या इंडस्ट्रीत येण्यासाठी स्वतःचं घर सोडलं. एवढी वर्षे मुंबईत राहिले. हे जर घरातूनच करायचं होतं तर त्यासाठी मी घर सोडलं नसतं. इंस्टावरील फॉलोअर्स वरून तुम्ही उत्कृष्ट अभिनेत्री आहेत हे ठरवलं जातं का? मला यावर तुम्ही सल्ला द्या, मी काही जुन्या विचारांची नाही. सोशल मीडियाचा वापर करायलाच हवा मला स्वतःमध्ये हे काही बदल करायला हवेत का? मला अभिनय येतो त्यावर मला काम मिळायला हवं की इंस्टावरील फॉलोअर्स पाहून मला काम मिळायला हवं? मला या प्रश्नाचे उत्तर जरूर द्या”. असे म्हणत रुपालीने तिची खंत व्यक्त केली आहे.
दरम्यान, रुपाली मराठी कलाविश्वात बऱ्याच काळापासून सक्रीय आहे. तिने छत्रीवाली, ग्रहण, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, संत गजानन शेगावीचे , आम्ही बेफिकर, मुस्कान अशा अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.