विविध भाषांमध्ये काम करायला आवडेल-इशा केसकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 01:01 PM2017-10-13T13:01:04+5:302017-10-13T18:31:04+5:30
अबोली कुलकर्णी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या खंडोबांच्या जीवनावरील पौराणिक मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतून इशा ...
झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या खंडोबांच्या जीवनावरील पौराणिक मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतून इशा केसकर हिला ‘बानू’ या व्यक्तिरेखेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाच्या माध्यमातून ती रसिकांच्या भेटीला आली आहे. यानिमित्ताने आणि एकंदरितच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी मारलेल्या या गप्पा...
* ‘जय मल्हार’ या मालिकेतील तुझी बानू ही व्यक्तीरेखा खूप गाजली. यानंतर तुझं आयुष्य कसं बदललं?
- ‘जय मल्हार’ या मालिकेत मला बानूची व्यक्तिरेखा करायला मिळणं हे माझं भाग्यच. ही माझ्या आयुष्यातील पहिली भूमिका होती. या मालिकेमुळे माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. बानू व्यक्तिरेखेमुळे मला बरंच काही शिकायला मिळालं.
* तुझ्या ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाविषयी काय सांगशील?
- ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाचे कथानक खूपच वेगळे आहे. नाटकातील गाणी देखील खूप सुंदर आहेत. शाहिर आणि सुत्रधार हे या नाटकाची गोष्ट पुढे नेतात. गोष्ट साधी असून यात कुठलीही नकारात्मकता नाही. सुभेदाराची आणि पत्नी जानकीची ही गोष्ट असून मी यात जानकीच्या दासीची भूमिका साकारत आहे. ती जानकीला तिची काही आश्वासने पूर्ण करायला मदत करत असते.
* मालिकेनंतर आता तू रंगभूमीकडे वळताना दिसते आहेस. तर पुन्हा तू आम्हाला मालिकेत केव्हा पाहायला मिळशील?
- मी पुन्हा एकदा छोटया पडद्यावर लवकरच दिसेन, असे मला वाटते. मी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असते. नक्कीच मला आवडेल एखाद्या दुसऱ्या माध्यमांत काम करायला.
* सध्या वेबसीरिजचा सुरू असलेला ट्रेंड पाहता तुझा वेबसीरिजमध्ये काम करण्याचा काही विचार आहे का?
- वेबसीरिजमध्ये काम करायला मला नक्कीच आवडेल. परंतु, मी त्या वेबसीरिजमध्ये काम करण्याअगोदर ती वेबसीरिज कोण साकारतंय? दिग्दर्शक कोण असणार? या सर्वांचा विचार करूनच यात काम करीन. मात्र, सध्या तरी मला कुठल्या वेबसीरिजची आॅफर मिळालेली नाही.
* भूमिका निवडताना तू कोणत्या गोष्टींची काळजी घेतेस?
- मालिकांमध्ये काम करत असताना त्या मालिकेत मला किती काम असणार आहे? माझ्या भूमिकेला किती महत्त्व आहे? त्या भूमिकेतून मला नवीन काही शिकायला मिळेल का? या सर्व गोष्टींचा मी विचार करत असते.
* सध्या बऱ्याच मराठी अभिनेत्री हिंदी चित्रपटांकडे वळताना दिसत आहेत. तसा तुझा काही विचार?
- विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करायला मला आवडते. मला तर असं वाटते की, प्रत्येक कलाकाराने विविध भाषांमध्ये काम करायलाच हवे. हिंदी, तेलगु, बंगाली अशा विविध भारतीय भाषांमध्ये कलाकाराने काम केले पाहिजे. मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच करेन.