Special Interview : ‘Y’ सिनेमा शूट करताना...! मुक्ता बर्वेसाठी काय होतं सर्वात मोठ चॅलेंज?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 03:17 PM2022-06-20T15:17:05+5:302022-06-20T15:18:34+5:30
'Y' Movie : गेल्या काही दिवसांपासून एका मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे, ‘Y’. मुक्ता बर्वेचा (Mukta Barve ) हा सिनेमा येत्या शुक्रवारी (24 जून) तुमच्या आमच्या भेटीस येतोय.
Mukta Barve Interview : गेल्या काही दिवसांपासून एका मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे, ‘Y’. मुक्ता बर्वेचा (Mukta Barve ) हा सिनेमा येत्या शुक्रवारी (24 जून) तुमच्या आमच्या भेटीस येतोय. मात्र त्या आधी या सिनेमानं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. सिनेमाचं ‘वाय’ हे नाव, मराठीतील पहिला हायपरलिंक सिनेमा असल्याचा दावा, दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी घडणाऱ्या धक्कादायक घटना...हे सगळं काय, असे प्रश्न सगळ्यांनाच पडले आहेत. येत्या शुक्रवारी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. पण त्याआधी मुक्तानं यापैकी काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने मुक्ताने ‘लोकमत फिल्मी’ला एक खास मुलाखत दिली, त्याचाच हा सारांश...
काय आहे नेमका ‘Y’?
‘वाय’ हा एक थरारपट आहे. हायपरलिंक... हायपरलिंक...असं सारखं म्हटलं जातंय. साध्या भाषेत याचा अर्थ सांगायचा झाल्यास एका टाईमलाईनमध्ये, एकाच वेळेत अनेक ठिकाणी घडलेले प्रसंग शेवटी एका गोष्टीला येऊन मिळतात. अनेक नद्या एकत्र येऊन समुद्र तयार होतो. तसा हा हायपरलिंक सिनेमा असणार आहे. यासाठी खूप तगडा स्क्रीनप्ले असण्याची गरज असते आणि जो आमच्या लेखक टीम आणि दिग्दर्शकाने चांगलाच बांधलाय. ज्याच्या मी प्रेमात पडले आणि सिनेमा करायला घेतला, असं मुक्ताने यावेळी सांगितलं.
तो सर्वात चॅलेंजिंग टास्क...
जेव्हा एका सत्यघटनेचा संदर्भ घेऊन तुम्ही काहीतरी करता, तेव्हा तुमच्यावर एक मोठी जबाबदारी पण असते. या सिनेमातली भूमिका साकारताना माझ्यासाठी सर्वाधिक चॅलेंजिंग काय होतं? असं विचाराल तर यातली भाषा खूप वेगळी आहे. मी एका शासकीय महिला अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यात मी मराठवाड्याची भाषा बोलतेय, त्या भाषेचा लहेजा सांभाळणं, त्यातून भावभावना दर्शवणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, असं मुक्ता म्हणाली.
109 दिवसांचं शूट
हो,109 दिवस शूट झालं खरं. त्यातले सगळे दिवस मी नव्हते शूटींगला. पण विषय जेव्हा खूप मोठा असतो आणि त्यांची मांडणी जेव्हा विस्तृतपणे केली जाते, तेव्हा बजेटचा विचार करून मांडणी नाही करता येत. त्यासाठी निर्मात्यांचा पाठींबा लागतो, विश्वास लागतो. आमच्या निर्मात्यांनी तो विश्वास दाखवला. शेवटपर्यंत ते आमच्या सिनेमासोबत राहिले, याचं खरं तर आम्हाला कौतुक आहे. केवळ दिग्दर्शकावर विश्वास ठेवून निर्मात्यांनी या सिनेमावर पैसा लावला. जास्त दिवस शूट झालं. पण त्याचा परिणाम 100 टक्के पडद्यावर दिसेल असं मुक्ता म्हणाली.