१ मे रोजी उघडणार 'यशवंत'चा दरवाजा! नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू होणार नाट्यगृह
By संजय घावरे | Published: April 4, 2024 10:03 AM2024-04-04T10:03:50+5:302024-04-04T10:04:43+5:30
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर मागील दोन महिन्यांपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर यशवंत नाट्य मंदिर १ मे रोजी नवा साज लेऊन रसिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर मागील दोन महिन्यांपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर यशवंत नाट्य मंदिर १ मे रोजी नवा साज लेऊन रसिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोनाच्या काळात १३ मार्च २०२० रोजी बंद झालेले यशवंत नाट्य मंदिर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नवीन कार्यकारिणी येताच पुन्हा सुरू करण्यात आले. नवीन कार्यकारिणीने अत्यावश्यक कामे पूर्ण करून १४ जून २०२३ रोजी नाट्यगृह पुन्हा सुरू केले, पण काही महत्त्वाची कामे शिल्लक राहिली होती. त्यासाठी फेब्रुवारी २०२४पासून पुन्हा हे नाट्यगृह बंद करण्यात आले. १ फेब्रुवारीपासून व्यावसायिक नाटकांसाठी नाट्यगृह बंद करण्यात आल्यानंतर नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यशवंत नाट्य मंदिराच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मुख्य नाट्यगृहासोबतच रिहर्सल हॅालची दुरुस्ती आणि इतर महत्त्वाची कामे करण्यात येत आहेत. याबाबत 'लोकमत'शी बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही रिहर्सल हॅालचे काम हाती घेतले. हा हॉल साऊंड प्रूफ करण्यात येत आहे. अत्याधुनिक साऊंड सिस्टीम बसवण्यात आली आहे. प्रकाशयोजना उत्तम होण्यासाठी चांगले लाईट्स लावण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास अतिरीक्त लाईटसही वापरण्याची सोय करण्यात आली आहे. रिहर्सल हॉल वातानुकूलित करण्यात आला असून, साधारणपणे ६० जणांची बसण्याची व्यवस्था आहे. इथे प्रायोगिक नाटकांसोबतच बालरंगभूमीला प्राधान्य देण्यात येणार आहे. एक सुसज्ज तालिम हॅाल रंगकर्मी आणि रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. एप्रिलमध्ये यशवंत नाट्य मंदिराचे काम पूर्ण होणार असल्याचे दामले यांनी सांगितले आहे.
मुख्य नाट्यगृहाबाबत दामले म्हणाले की, मुख्य नाट्यगृहाचे बांधकाम खूप जुने असून, तिथे २८ वर्षांपूर्वीची वातानुकूलित यंत्रणा आहे. हि यंत्रणा कधीही बंद पडण्याच्या स्थितीत होती. एसी एन्चार्जच्या सूचनेनुसार पूर्ण यंत्रणा बदलण्यात येणार आहे. गो. ब. देवल स्मृतीदिन साजरा करण्यासाठी खूप वेगाने तात्पुरती काम करून नाट्यगृह सुरू केले होते, पण आता १०० टक्के नूतनीकरण करण्यात येत आहे. यात स्वच्छतागृहे, मेकअप रुम्स, लाईट्स, वॅाटरप्रूफिंग, अकॅास्टिक्सचे काम केले जाणार आहे. मुख्य नाट्यगृहातील खुर्च्या चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे फक्त कव्हर बदलली जाणार आहेत. अग्निशमन दलाच्या सर्व सूचना आणि नियमांचे पालन करण्यात आले आहे.
८० टक्के काम पूर्ण...
बंगलूरूहून दोन-तीन दिवसांत नवीन वातानूकूलीत यंत्रणा येणार आहे. एसी प्लान्ट बसवल्यावर अंतर्गत कामांना गती मिळणार आहे. तालिम हॅालचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, संपूर्ण संकुलाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.